भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे. देशात आतापर्यंत दिलेल्या करोनाविरोधी लसींच्या डोसची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने इतिहास रचला आहे, हा भारतीय विज्ञान, उद्योग, भारतीयांच्या सामूहिक भावनेचा विजय आहे असे म्हटले आहे. लसींच्या डोसची संख्या १०० कोटी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले होते., जिथे त्यांनी रुग्णालय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

त्यानंतर त्यांनी इन्फोसिस फाउंडेशनच्या विश्राम सदनाच्या उद्घाटन प्रसंगी संवाद साधला. “२१ ऑक्टोबर २०२१ चा हा दिवस इतिहासात नोंदवला गेला आहे. भारताने काही वेळापूर्वीच १०० कोटींच्या लसीचा टप्पा पार केला आहे. १०० वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी देशाकडे १०० कोटींच्या लसीचे मजबूत सुरक्षा कवच आहे. ही कामगिरी भारताची आहे. देशाच्या लसनिर्मिती करणाऱ्या, पुरवठा करणाऱ्या आणि लस देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. काहीवेळापूर्वी मी राम मनोहर लोहिया रुग्णालयातील व्हॅक्सीन सेंटरला भेट देऊन आलो. उत्साह आहे आणि जबाबदारीची भावना देखील आहे की आपण एकत्रितपणे कोरोनाला पराभूत केले पाहिजे. मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. १०० कोटी लसींच्या डोसचे हे यश मी प्रत्येक देशवासियांना समर्पित करतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी १०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर या संदर्भात ट्वीटही केले आहे. “भारताने इतिहास रचला आहे. आम्ही भारतीय विज्ञान, उद्यम आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. १०० कोटी लसीकरण पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि प्रत्येकाने ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्यांचे आभार,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे लसीकरण मोहीम पुढे नेल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे सतत कौतुक करत आहेत.

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे पंतप्रधानांकडून कौतुक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचेही कौतुक केले. “मी मनोहर लालजींना बऱ्याच काळापासून ओळखतो, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिभा समोर आली आहे. मनोहर लाल अनेकदा चांगले प्रयोग करतात. कधीकधी केंद्र सरकारला असेही वाटते की आपणही असे प्रयोग केले पाहिजेत. मनोहर लाल खट्टर यांनी दीर्घ विचाराने घातलेला पाया हरियाणाच्या विकासासाठी खूप प्रभावी ठरणार आहे,” असे मोदी म्हणाले.