नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) विकास आणि वापराचे लोकशाहीकरण झाले पाहिजे. ‘एआय’चा विकास ओपन सोर्स पद्धतीने झाला पाहिजे तरच त्याचा लाभ जगभरातील तमाम लोकांच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी होऊ शकेल, अशी स्पष्ट व ठाम भूमिका मांडत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरणात्मक मालमत्ता मानून गुप्तपणे ‘एआय’चा विकास करणार्या देशांना व कंपन्यांना सज्जड इशारा दिला.
‘भारत मंडपम’ येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. १०० हून अधिक देशांचे प्रमुख, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, नवोन्मेषक व तरुण व्यावसायिकांच्या खचाखच भरलेल्या मेळाव्यात मोदींनी भारताची ‘एआय’संदर्भातील ‘एमएएनएव्ही’ (मानव) रूपरेषा स्पष्ट केली. त्याचवेळी एआयच्या लोकशाही वापराला विरोध करणार्यांवरही तीव्र टीका केली. ‘जगातील काही देश आणि कंपन्या ‘एआय’ गुप्तपणे विकसित करण्यासाठी धोरणात्मक मालमत्ता मानतात, पण ‘एआय’चा विकास व वापर सामायिक होईल तेव्हाच जगाला त्याचा फायदा होईल, असे भारत मानतो. ओपन कोड सोर्स आणि एआयच्या विकासाची देवाणघेवाण झाली तरच लाखो तरुणांना त्याचा लाभ मिळेल आणि ते ‘एआय’ अधिक सुयोग्य व सुरक्षित बनवतील. ‘एआय’ला जागतिक सामूहिक हितासाठी विकसित केले पाहिजे, असे मत मोदींनी मांडले.
‘एआय’ मानवी इतिहासातील ऐतिहासिक वळण असून ‘एआय’चा वापर लोकशाही, नैतिक व सर्वसमावेशक पद्धतीने झाला पाहिजे, तसेच संपूर्ण जगाच्या विशेषत: ‘ग्लोबल साऊथ’च्या हितासाठी असला पाहिजे. जगात दोन प्रकारचे लोक आहेत. काहींना एआयची भीती वाटते. तर काही ‘एआय’ला भविष्य मानतात. भारत ‘एआय’मध्ये भाग्य आणि भविष्य पाहतो, असे मोदी म्हणाले. त्याअनुषंगाने उद्घाटनाच्या कार्यक्रमात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, ‘अँथ्रोपिक’चे सीईओ डारियो अमोदेई, ‘गूगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारताच्या ‘एआय’ क्षेत्रातील प्रगतीबाबत आश्वासक मत व्यक्त केले.
‘मानव’ रूपरेषा
’एम (मॉरल अँड एथिकल सिस्टीम) म्हणजे नैतिक प्रणाली : ‘एआय’चा विकास मजबूत नैतिक मूल्यांच्या आधारे झाला पाहिजे.
’ए (अकाऊंटेबल गव्हर्नन्स) म्हणजे जबाबदार प्रशासन : पारदर्शक नियम आणि प्रभावी देखरेख असली पाहिजे.
’एन (नॅशनल सॉव्हरेंटी)
म्हणजे राष्ट्रीय सार्वभौमत्व : ज्याचा माहिती विदा, त्याची त्यावर मालकी असली पाहिजे.
’ए (ॲक्सेसिबल अँड इन्क्लुजिव्ह) म्हणजे सुलभ आणि समावेशक : एआय जबाबदार असले पाहिजे, त्याबाबत कोणाची मक्तेदारी असू शकत नाही.
’व्ही (व्हॅलिड अँड लिजिटमेट) म्हणजे वैध आणि कायदेशीर : एआय कायदेशीर, पडताळणीयोग्य आणि विश्वासार्ह असले पाहिजे.
बिल गेट्स गैरहजर
एप्स्टीन फाइल्समुळे वादात सापडलेले मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स ‘एआय इम्पॅक्ट समिट’च्या उद्घाटन कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. गेट्स या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे संकेत केंद्र सरकाने दिले होते. मात्र, बिल गेट्स यांच्या प्रवक्त्यांकडून गेट्स कार्यक्रमाला हजर राहतील असे सांगितले गेले होते. गुरुवारी अखेर गेट्स यांच्या अनुपस्थितीची माहिती प्रवक्त्यांकडून देण्यात आली.
