पीटीआय, नवी दिल्ली : भारताची आर्थिक प्रगती संपूर्ण जगाच्या विकासाबरोबर होत आहे. मजबूत आर्थिक पाया, वित्तीय स्थैर्य आणि सातत्यपूर्ण सुधारणांच्या बळावर भारत जागतिक अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
‘‘आमची प्रगती कोणावर अवलंबून नाही. आम्ही जगाबरोबर आणि जगाच्या विकासासाठी प्रगती करतो,’’ असे मोदी यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले. जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि महत्त्वाच्या संसाधनांवरील वाढती स्पर्धा अशा परिस्थितीत भारताची वाढती आर्थिक व तांत्रिक क्षमता जागतिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असेही ते म्हणाले.
एप्रिल ते जून या तिमाहीत भारताने नोंदवलेला ७.८ टक्के आर्थिक विकासदर, ७०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक असलेला परकीय चलनसाठा आणि करप्रणाली, दिवाळखोरीविषयक कायदे तसेच कामगार कायद्यांमधील सुधारणा यांचा उल्लेख करत मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेवर भर दिला. कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताचा विकासदर सर्वाधिक असून, ही वाढ भक्कम पायावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘सामर्थ्याचा उपयोग इतरांना सक्षम करण्यासाठी’
भारताच्या विकासाची संकल्पना मांडताना मोदी यांनी ‘सामर्थ्यातून सक्षमीकरण’ या तत्त्वावर भर दिला. आर्थिक आणि तांत्रिक सामर्थ्याचे खरे मोजमाप इतरांवर नियंत्रण मिळवण्यात नसून, त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण करण्यात आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वच्छ ऊर्जेवर भर
स्वच्छ ऊर्जा हा भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातील आणखी एक महत्त्वाचा घटक असल्याचे मोदी यांनी सांगितले. देशाने नोव्हेंबर २०२१मध्येच स्थापित वीजक्षमता नॉन-फॉसिल इंधन स्रोतांमधून ४० टक्के मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य केले. २०१४मध्ये भारताची अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे ७५ गिगावॉट होती. ती आता सुमारे ३०० गिगावॉटपर्यंत पोहोचल्याचे मोदी यांनी सांगितले.
जागतिकीकरणामुळे देशांमधील परस्परावलंबित्व वाढले असले, तरी पुरवठा साखळी, ऊर्जा, महत्त्वाची खनिजे, देयक प्रणाली आणि तंत्रज्ञान यांचा वापर आता भू-राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी केला जात आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
