टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या दोन खेळाडूंना योग्य वैद्यकीय मदत आणि प्रशिक्षण मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मध्यस्थी करावी लागली होती. टोक्यो ऑलिम्पिकच्या आधी अमेरिकेत असताना नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करत मदत केल्याचा खुलासा मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी केला आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह सध्या दिल्लीत नरेंद्र मोदी तसंच इतर वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून पायाभूत सुविधांसंबंधी प्रकल्पांसाठी आर्थिक मदत यावेळी ते मागणार आहेत.

रौप्यपदक विजेत्या मिराबाई चानूकडून १५० ट्रक ड्रायव्हर्सचा सत्कार आणि मेजवानी; कारण जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान

दरम्यान एएनआयशी बोलताना मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सांगितलं की, आपण या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली तेव्हा मिराबाई चानूला केलेल्या मदतीसाठी आभार मानले. यावेळी त्यांनी मिराबाई चानूने सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना आपल्याला पंतप्रधानांकडून मिळालेल्या मदतीचा उल्लेख केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

“पंतप्रधानांकडून तिला मिळालेल्या मदतीची माहिती मिळाल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. जर आपल्याला स्नायूच्या सर्जरीसाठी अमेरिकेत जाण्याची आणि प्रशिक्षण करण्याची संधी मिळाली नसती तर हे यश मिळालं नसतं असं तिने सांगितलं. यावेळी तिने मोदींनी कशा पद्दतीने आपल्याला थेट मदत केली हे सांगितलं. मोदींनी तिला मदत करत इतकी मोठी समस्या छोटी केली. मोदींनी कशा पद्दतीने मिराबाईला मदत केली हे समजल्यानंतर मणिपूरमधील लोकांनाही आनंद झाला आहे,” असं एन बिरेन सिंह यांनी सांगितलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मोदींच्या भेटीदरम्यान या भेटीसाठी आभार मानले. “मिराबाई चानूला केलेल्या मदतीसाठी आभार मानले असता मोदींच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्यांनी अजून एका खेळाडूला मदत केली आहे. हेच एका नेत्यांचं मोठेपण आहे,” असं ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मिराबाईला पाठदुखीचा त्रास जाणत होता. ही माहिती मोदींपर्यंत पोहोचली होती. यानंतर त्यांनी मध्यस्थी करत तिच्यावरील परदेशातील सर्व उपचाराचा आणि प्रशिक्षणाचा खर्च उचलला. मला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी अजून एका खेळाडूला मदत केली आहे. मात्र त्यांनी कुठेही याचा उल्लेख केला नाही. मी नाव सांगणार नाही पण त्यांनी अजून एका खेळाडूला अमेरिकेला पाठवत उपचार आणि प्रशिक्षणाची व्यवस्था केली. त्यांच्यासारखे पंतप्रधान लाभले हे भारतीय म्हणून मी भाग्यशाली समजतो”.