PM Modi Israel Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. मोदींचं इस्रायलमध्ये बुधवारी जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे त्यांची पत्नी सारा यांच्यासह बेन गुरियन विमानतळावर उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेला संबोधित करत विविध महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं.
‘भारत आता आणि भविष्यातही इस्रायलबरोबर खंबीरपणे उभा आहे’, असा विश्वास मोदींनी इस्रायलला दिला. तसेच ‘भारताने इस्रायलला अधिकृत मान्यता दिली, त्या दिवशी माझा जन्म झाला’, असंही वक्तव्य मोदींनी यावेळी केलं. ‘भारत बऱ्याच काळापासून दहशतवाद सहन करतोय’, असं म्हणत मोदींनी सूचक इशाराही दिला.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
इस्रायलच्या संसदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “या सन्माननीय सभागृहासमोर उभं राहणं माझ्यासाठी एक भाग्य आणि सन्मान आहे. मी हे भारताचा पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या संस्कृतीला संबोधित करत आहे. मी माझ्यासोबत १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा, मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन इस्रायलमध्ये आलो आहे.”
मोदी पुढे म्हणाले की, “नागरिकांच्या हत्येचं कधीही समर्थन करू शकत नाही. दहशतवादाचं कोणीही समर्थन करू शकत नाही. भारतानेही बऱ्याच काळापासून दहशतवादामुळे दुःख सहन केलंय. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात इस्रायली नागरिकांसह निष्पाप जीव गमावल्याचं दुःख आजही आम्हाला आहे. तुमच्याप्रमाणे आमचंही दहशतवादाबद्दल शून्य-सहिष्णुता धोरण आहे.”
“गेल्या काही वर्षांपासून भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. गेल्या काही वर्षांत भारताने इतर देशांबरोबर अनेक महत्त्वाचे व्यापारी करार केले आहेत. त्यासाठी आमची टीम एका मोठ्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीसाठी कठोर परिश्रम घेत आहे”, असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “भारताने इस्रायलला अधिकृत मान्यता दिली, त्या दिवशी (१७ सप्टेंबर १९५०) माझा जन्म झाला. तसेच ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या निर्दयी दहशतवादी हल्ल्यात ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्या प्रत्येक कुटुंबाला मी भारतातील जनतेच्यावतीने माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्हाला तुमचं दुःख समजतं. भारत आत्ता आणि भविष्यातही पूर्ण आत्मविश्वासाने इस्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे.”
पंतप्रधान मोदी अन् नेतान्याहू यांच्या भेटीवेळी भगव्या रंगावरून संवाद
झालं असं की, बेन गुरियन विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी नेतान्याहू हे त्यांच्या पत्नीसह उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी विमानातून खाली उतरल्यानंतर नेतान्याहू यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नेतान्याहू यांच्या पत्नी सारा यांच्याशीही हस्तांदोलन केलं. यावेळी नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींच्या पॉकेट स्क्वेअरच्या रंगाकडे आणि त्यांच्या पत्नी सारा यांच्या पोशाखाच्या रंगाकडे लक्ष वेधलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी उत्तर देत म्हटलं की, “हो, हो… भगवा.” आणि तिघेही हसायला लागले, या क्षणांची जोरदार चर्चा रंगली.
‘दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बुधवारी इस्रायलमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आगमन झालं. त्यावेळी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान मोदींचा गेल्या नऊ वर्षांतील इस्रायलचा हा दुसरा दौरा आहे. जुलै २०१७ मध्ये मोदी इस्रायलमध्ये आले होते. त्या वेळी दोन्ही देशांतील संबंधांना सामरिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला. पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेला संबोधित केलं. नेतान्याहू आणि मोदी गुरुवारी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. इस्रायलच्या दौऱ्यापूर्वी जाताना मोदी यांनी दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील, याची खात्री असल्याचे वक्तव्य केलं होतं.

