Israeli Ambassador Reuven Azar : पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात इस्रायल दौऱ्यावर गेले होते. तिथून परतल्यानंतर इस्रायलने इराणविरोधात युद्ध छेडले. त्यामुळे या हल्ल्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती होती, अशी टीका त्यांच्यावर केली जातेय. दरम्यान, या हल्ल्याबाबत नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर निर्णय घेण्यात आल्याचं भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. याचा आज त्यांनी पुनरुच्चार केला. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला येण्याआधीच इराणविरोधातील संबंध ताणले गेले होते. त्यामुळे इस्रायलकडून इराणविरोधात कारवाई करण्याकरता संधीची वाट पाहिली जात होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमधून भारतात परतल्यानंतर दोन दिवसांनी इस्रायलला इराणवर हल्ला करण्याकरता संधी मिळाली, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दोन दिवसांनी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला
“पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर दोन दिवसांनी मंत्रिमंडळाने हल्ल्याबाबत निर्णय घेतला. आम्ही भारतासोबत कायम राहू. भारताबरोबर आमचे समान हितसंबंध आहेत. भारत भारतीय हितसंबंधांना पूरक असे राजनैतिक प्रयत्न करेल”, असंही इस्रायलचे राजदूत रुवेन अझर म्हणाले.
इराण आक्रमक आहेत
यावेळी त्यांनी इराणच्या प्रत्युत्तरावरही भाष्य केलं. ते म्हणाले, आम्हाला आश्चर्य वाटलं नाही. आम्हाला माहीत होतं की इराणी लोकांकडे या क्षमता आहेत. खरंतर जूनमध्ये केलेल्या प्रयत्नांनंतर आम्ही इराणी लोकांच्या क्षमता कमी केल्या आहेत. आता ते इस्रायलचं जे नुकसान करत आहेत ते जूनमध्ये त्यांनी केलेल्या नुकसानीपेक्षाही खूपच कमी आहे. त्यांनी या प्रदेशातील १२ देशांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं की हे पूर्णपणे बेजबाबदार आहे. त्यांच्यावर दबाव आहे आणि तो कायम राहील कारण ते आक्रमक आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान जिवंत
इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूच्या अफवेबद्दल ते म्हणाले, पंतप्रधान नेतान्याहू जिवंत आहेत. मी इस्रायलमध्ये असताना त्यांना एकापेक्षा जास्त वेळा पाहिजे होते. कॅफेमधील हा व्हिडिओ एआयने बनवलेला नाही.”
