पीटीआय, रोम

भारत आणि इटलीचे संबंध विशेष सामरिक भागीदारीच्या स्तरापर्यंत वृद्धिंगत करण्याबद्दल दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. त्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक आणि नव्या तंत्रज्ञानांमध्ये सहकार्य वाढवण्याचाही दोन्ही देशांनी निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर याविषयी माहिती देण्यात आली.

पंतप्रधान मोदी मंगळवारी रात्री इटलीला पोहोचले. हा त्यांचा पाच देशांच्या दौर्याचा शेवटचा टप्पा आहे. रोममध्ये पोहोचल्यानंतर मोदी यांचे लष्करी सन्मानाने स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यापूर्वी मोदींनी इटलीचे अध्यक्ष सर्जिओ मॅटरेला यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक संबंध यांच्यासह भारत-इटली मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), दुर्मीळ खनिजे, अवकाश आणि अणुऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्यावरही मोदी आणि मॅटरेला यांनी चर्चा केली.

भारत-इटली संबंध वृद्धिंगत करण्यावर आम्ही विस्तृतपणे चर्चा केली, असे पंतप्रधान मोदी यांनी मेलोनी यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात नमूद केले. या दौर्यामध्ये आपण इटलीबरोबरचे संबंध दृढ करण्यावर, विशेषत: भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक कॉरिडॉरवर (आयएमईसी) लक्ष केंद्रित करत असल्याचे मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिले.

भारताच्या विकासामध्ये इटलीच्या ८००पेक्षा जास्त कंपन्या योगदान देत आहेत, असे मेलोनी यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदी यांचे रोममध्ये आगमन झाल्यानंतर द्विपक्षीय चर्चेपूर्वी मेलोनी यांनी त्यांच्यासाठी भोजन आयोजित केले, तसेच दोन्ही नेत्यांनी रोममधील ऐतिहासिक कोलोजियमला एकत्र भेट दिली.

वाढते सहकार्य

– जॉर्जिया मेलोनी २०२३ मध्ये जी-२० शिखर परिषदेसाठी भारत दौर्यावर

– युरोपीय महासंघातील इटली हा भारताचा चौथ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश

– २०२५मध्ये द्विपक्षीय व्यापार १४.२५ अब्ज युरो, २०२४च्या तुलनेत ९.४२ टक्के वाढ

– भारताची इटलीला निर्यात ८.५५ अब्ज युरो

– भारताची इटलीकडून आयात ५.७० अब्ज युरो

– २०२९पर्यंत वार्षिक २० अब्ज युरो द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष

– जानेवारी २०२५च्या आकडेवारीनुसार, इटलीमध्ये एक लाख ८६ हजार ८३३ भारतीय

– युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांपैकी इटलीमध्ये सर्वाधिक भारतीय

– इटलीच्या विद्यापीठांमध्ये ५,१००पेक्षा जास्त विद्यार्थी

मेलडी भेटीवरून विरोधकांची टीका

इटलीच्या दौर्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलडी चॉकलेट भेट दिले. या भेटीबद्दल मेलोनी यांनी मोदींचे आभार मानले. विरोधकांनी या भेटीबद्दल टीका केली आहे. देशावर मोठे आर्थिक वादळ घोंघावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये चॉकलेट वाटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोदींना यावरून लक्ष्य केले. एकीकडे जनता सरकारच्या लुटीच्या दु:खात जगत आहे. मात्र, या काळातही जनतेने मेलडी भेटीचा आनंद घ्यावा, असे पंतप्रधानांना वाटते, असा टोला खरगे यांनी लगावला.

भारत-इटली संबंध वृद्धिंगत करण्यावर आम्ही व्यापक चर्चा केली. २०२५ ते २०२९ची भारत-इटली संयुक्त सामरिक कृती योजनेतून आमच्या संबंधांना व्यवहार्य आणि भविष्यवादी आराखडा प्राप्त होतो. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारत आणि इटलीची मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित आहे. हिंद-प्रशांत महासागरी प्रदेशात वाहतुकीचे स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. – जॉर्जिया मेलोनी, पंतप्रधान, इटली