Congress Slams PM Modi over WPI Inflation Rate: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नपदार्थ, इतर वस्तू, इंधन आणि वीज यांच्या वाढत्या किमतींमुळे ऑगस्टमध्ये ‘घाऊक किंमत निर्देशांक’ (WPI) महागाईचा दर वाढून ९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.८ टक्के इतका नोंदवला गेल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विदेशातून व्हिडीओद्वारे संदेश देत देशाची प्रगती होत असल्याचे म्हटले होते. मात्र घाऊक किंमत निर्देशांकात महागाईचा दर वाढता दिसल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. “पंतप्रधान मोदी वारंवार ‘सब चंगा सी’ (सगळे काही ठीक आहे) असा दावा करत असले तरी प्रत्यक्षात ‘सब महंगा सी’ (सगळे काही महाग आहे)”, अशी टीका त्यांनी केली.
एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये जयराम रमेश म्हणाले, “गेल्या सलग चार महिन्यांपासून घाऊक किंमत निर्देशांक महागाईचा दर १० टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. यामुळे कोट्यवधी कुटुंबांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.”
यानंतर जयराम रमेश यांनी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMIE) निष्कर्षांकडे लक्ष वेधले.
“सीएमआयईने दिलेल्या आकडेवारीनुसार, महागाईच्या हिशोबाने जी मजुरी मिळायला हवी, त्यातही मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. ही आणखी एक समस्या वाढवणारी बाब आहे. एप्रिलपासून आतापर्यंत यात ५.७ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. ग्रामीण भागात तर ही घसरण ९ टक्क्यांपर्यंत असल्याचे नोंदवले गेले आहे. यामुळे पंतप्रधान कितीही दावे करत असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती भीषण आहे”, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.
महागाईचा दर किती वाढला?
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डब्लूपीआय महागाईचा दर वाढून ९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलैमध्ये हा दर ९.७८ टक्के होता. अन्नपदार्थांच्या निर्देशांकातील महागाईचा दर जुलैमधील ६.६५ टक्क्यांवरून वाढून ऑगस्टमध्ये ७.०५ टक्क्यांवर गेला आहे. उत्पादित वस्तूंच्या बाबतीत, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ८.३७ टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला असून, तो जुलैमध्ये ८.२९ टक्के होता.
तर इंधनामध्ये, खनिज-तेल महागाई ३२.४० टक्क्यांवरून ३८.४८ टक्क्यांवर पोहोचली, तर कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूची महागाई २६.९९ टक्क्यांवरून ३४.४१ टक्क्यांवर पोहोचली.
