पीटीआय, कोची
पश्चिम आशियातील स्थितीबाबत विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पश्चिम आशियातील युद्धामुळे जे भारतीय अडकले आहेत त्यांच्या मदतीसाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. याबाबत काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केरळ आणि तमिळनाडूचा दौरा केला. केरळच्या कोची येथे जाहीर सभेत बोलताना त्यांनी सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी तसेच विरोधक काँग्रेसला लक्ष्य केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांना देशाच्या प्रगतीबाबत काहीच माहीत नाही, ते देशाच्या विकासाबाबत विरोधी पक्षनेते अनभिज्ञ आहेत, अशा शब्दांत मोदींनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले.
केरळच्या जनतेनेच आता डावे पक्ष तसेच काँग्रेसकडे आलटून-पालटून सत्ता देण्याची रचना बदलावी असे आवाहन मोदी यांनी केले. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शबरीमला मंदिरातील लुटीबाबत हेच दोघे भागीदार असल्याचा आरोपही मोदींनी केला.
१० हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केरळ दौऱ्यात १० हजार कोटींच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. कोचीमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयासह विविध केंद्र सरकारच्या मंत्रालयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले.
