पीटीआय, पलक्कड
पश्चिम आशियातील युद्धाचा भारतावर कमीत कमी परिणाम कसा होईल, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केरळमधील पलक्कड येथे आयोजित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सभेत ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘युद्ध सुरू झाल्यापासून सर्व देशांच्या प्रमुखांशी सातत्याने संपर्कात आहे. युद्धामुळे आखातात अडकलेल्या अनेक भारतीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आहे. भारतीय दूतावास नागरिकांना मदत करण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, ‘या संवेदनशील विषयावर काँग्रेस जी विधाने करत आहे ती धोकादायक आहेत. राजकीय फायद्यासाठी काँग्रेस आखाती देशांत राहणाऱ्या सुमारे एक कोटी भारतीयांचे जीव धोक्यात घालू इच्छित असल्याचे ते म्हणाले.
‘गेल्या अनेक दशकांपासून डावी आघाडी आणि काँग्रेस यांनी मिळून केरळची लूट केली आहे,’ असा आरोप त्यांनी केला. केरळमध्ये बदलाची लाट दिसत असून युवक, महिला आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजपला पाठिंबा देत आहेत असा दावा पंतप्रधानांनी केला.
दरम्यान त्रिशूर येथे पंतप्रधान मोदी यांचा रोड शो पार पडला. रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार पद्मजा वेणुगोपाल आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी हेही या रोड शोमध्ये सहभागी झाले.
