“सरकारच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होईल”

केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास

“लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसली आहे. पण ‘आत्मनिर्भर पॅकेज’च्या माध्यमातून लोकांची उद्यमशक्ती वाढण्यास मदत झाली आहे. आगामी काळात सरकारच्या उपाययोजनांमुळेच सामान्य जनतेच्या हातात आणखी पैसा येईल आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेचे चक्र आणखी गतिमान होण्यासाठी होईल”, असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी व्यक्त केला. गेले काही दिवस GDPवरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. त्याचा संदर्भ घेत त्यांनी आपले विचार मांडले. भारतीय जनता पार्टी प्रदेश शाखेने प्रवक्ते आणि पॅनेलिस्टसाठी सुरु केलेल्या ‘प्रमोद महाजन संवाद माला’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात ते बोलत होते.

अनुराग ठाकूर यांनी लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या अर्थव्यवस्थेपुढे उभ्या राहिलेल्या आव्हानांचा विस्ताराने आढावा घेत केंद्र सरकारने आत्मनिर्भर अभियान व गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली. “अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या मध्यम, सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या मदतीसाठी या क्षेत्रातील उद्योगांनी घेतलेल्या कर्जाच्या २० टक्के रक्कम खेळते भांडवल म्हणून उपलब्ध करून दिली आहे. या योजनेद्वारे १ लाख ११ हजार कोटी रूपये उद्योजकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. या योजनेद्वारे ३ लाख कोटी रु. वितरीत करण्यात येणार आहेत.मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगांची व्याख्या बदलल्याने या क्षेत्रातील उद्योगांना सरकारी योजनांचे अनेक फायदे मिळणार आहेत”, अशी त्यांनी माहिती दिली.

“पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर, किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना थेट मदत, किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना अडीच लाख रु. अल्प व्याजदरात कर्ज, दिव्यांग, विधवा, वृद्ध यांना १ हजार रूपये अतिरिक्त अर्थसहाय्य, स्थलांतरीत मजुरांसाठी त्यांच्या राज्यातच सुरु केलेली ग्रामीण रोजगार योजना , मनरेगा साठीची तरतूद १ लाख कोटी करणे , कृषी पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचा निधी अशा पद्धतीने पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधून अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. यामुळे कृषी क्षेत्रात ३ टक्के वाढ दिसली आहे”, असेही अनुराग ठाकूर यांनी नमूद केले.

या संवादमालेचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. पक्षाचे राज्यभरातील प्रवक्ते या संवादमालेला उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm modi led governments measures will revive the economy says central minister anurag thakur vjb

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या