PM Modi Malaysia Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अनेक महत्वाच्या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींचं मलेशियात जंगी स्वागत करण्यात आलं. यावर बोलताना ‘मलेशियातील स्वागत भारत कायम लक्षात ठेवेल’, असं म्हणत मोदींनी मलेशियाचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींनी मलेशियात बोलताना दहशतवादावर मोठं भाष्य करत पाकिस्तानला अप्रत्यक्ष संदेश दिला. ‘दहशतवादाबाबत भारताची भूमिका ठाम आहे, दहशतवादाबाबत भारताचा संदेश अगदी स्पष्ट आहे. दहशतवादाशी कोणतीही तडजोड होणार नाही’, असं म्हणत मोदींनी दहशतवादाचा मुकाबला करण्याबाबत भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

दरम्यान, भारत आणि मलेशियामधील धोरणात्मक विश्वास हा आर्थिक परिवर्तनाचा मार्ग आहे, यावर भर देत पंतप्रधान मोदींनी रविवारी दहशतवादाबाबत भारताची भूमिका दृढ आणि तडजोड न करता कायम असल्याची स्पष्ट केलं. शांततेच्या उद्देशाने केलेल्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा अधोरेखित करत शांततेसाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा कायम पाठिंबा असेल असंही मोदींनी स्पष्ट केलं.

‘दहशतवादाबाबत भारताची भूमिका ठाम असून आमचा संदेश स्पष्ट आहे. दहशतवादाबाबत कोणतेही दुहेरी निकष नाही किंवा कोणतीही तडजोड नाही’, असं मोदींनी मलेशियात बोलताना म्हटलं. दरम्यान, “एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाबरोबरच आम्ही सेमीकंडक्टर्स, आरोग्य आणि अन्न सुरक्षेमध्ये भारत आणि मलेशियामधील सहकार्य आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं मोदींनी सांगितलं आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

‘भारताला आज जगात विकासासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहिले जाते. याचा प्रत्यय ब्रिटन, अमेरिका, युरोपीय महासंघासह अनेक देशांबरोबर भारताने केलेल्या व्यापार करारांतून येतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मलेशियामध्ये केले. क्वालालंपूर येथे झालेल्या एका सामुदायिक कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, भारतीय वंशाचे लोक भारत आणि मलेशिया यांच्यातील मैत्रीचा मजबूत दुवा आहेत.

यावेळी मोदींनी ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, युरोपीय महासंघ आणि अमेरिका यांच्याशी झालेल्या करारांचा उल्लेख केला. भारत आणि मलेशिया एकमेकांना चांगले ओळखतात, कारण भारतीय भाषांमध्ये आणि मलय भाषेत अनेक सारखे शब्द आहेत, असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०२६ मधील हा त्यांचा पहिला परदेश दौरा असून मलेशियात येऊन आपल्याला खूप आनंद होत आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे पंतप्रधान होण्यापूर्वीपासूनच आपले मित्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मलेशियातील तमिळ समाज विविध क्षेत्रांत समाजसेवा करत आहे. ‘तमिळ समाज येथे अनेक शतकांपासून आहे. या समृद्ध इतिहासामुळेच आम्ही मलेया विद्यापीठात तिरुवल्लुवर चेअर स्थापन केली. आता सामायिक वारसा अधिक मजबूत करण्यासाठी तिरुवल्लुवर केंद्रही उभारणार आहोत,’ असे त्यांनी सांगितले.