पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ ऑक्टोबर रोजी मन की बात या रेडिओ कार्यक्रमात आपले विचार मांडणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा हा ८२ वा भाग असेल. हे कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ (AIR), दूरदर्शन, AIR न्यूज आणि मोबाईल अॅपच्या संपूर्ण नेटवर्कवर देखील प्रसारित केले जातील. खुद्द पंतप्रधानांनी याबाबत ट्विट करून माहिती शेअर केली.

पंतप्रधान मोदींनी याबद्दल एक ट्विट केले आहे. “मन की बात कार्यक्रम या महिन्यात २४ ऑक्टोबर रोजी प्रसारित केला जाईल. या भागासाठी आपल्या कल्पना सांगण्यासाठी मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो,” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपल्या मागील मन की बात कार्यक्रमात, पंतप्रधान मोदींनी भारतीय संस्कृतीतील रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या महत्त्वावर भर दिला होता. यामध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रीय जल अभियान मोहीम कॅच द रेनची तुलना जल-जिलानी एकादशी आणि छठ उत्सवाशी केली होती.

मन की बात हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मासिक रेडिओ कार्यक्रम आहे, जो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. हा कार्यक्रम पहिल्यांदा ३ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रसारित झाला होता. जानेवारी २०१५ मध्ये, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनीही मोदींसोबत कार्यक्रमाला उपस्थित राहून भारतीयांच्या पत्रांना उत्तरे दिली होती. पण या महिन्यात हा कार्यक्रम शेवटच्या रविवारच्या आधीच प्रसारित केला जाईल. तुम्ही हा कार्यक्रम रेडिओ, टिव्ही किंवा यूट्यूबवर ऐकू शकता.