पीटीआय, नवी दिल्ली
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या ‘तीव्र युद्धामुळे‘ निर्माण ‘आव्हानात्मक’ परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात बोलताना, मोदींनी सध्याच्या संकटाचे राजकारण करणाऱ्यांना इशारा दिला तसेच सद्य:स्थितीत स्वार्थी राजकारणाला काहीही स्थान नसल्याचे स्पष्ट केले. अफवा पसरवणारे लोक देशाचे मोठे नुकसान करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. जे लोक या मुद्द्याचे राजकारण करत आहेत, त्यांनी तसे करण्यापासून परावृत्त व्हावे; कारण हा १४० कोटी नागरिकांच्या हिताशी संबंधित विषय आहे. येथे स्वार्थी राजकारणाला काहीही स्थान नाही, असे पंतप्रधान म्हणाले. जनतेने सावध राहावे आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये. सरकारने सातत्याने पुरवलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि केवळ त्या माहितीच्या आधारेच कृती करावी, असे आवाहनदेखील पंतप्रधानांनी केले.
ज्याप्रमाणे देशातील जनतेने आपल्या सामूहिक शक्तीच्या जोरावर भूतकाळातील संकटांवर मात केली आहे, त्याचप्रमाणे यावेळीही आपण सर्वजण मिळून या कठीण परिस्थितीतून नक्कीच विजयी होऊन बाहेर पडू. आपले जागतिक संबंध, विविध देशांकडून मिळणारा पाठिंबा आणि गेल्या दशकात देशाने संपादन केलेली ताकद, या सर्व गोष्टींमुळेच भारताला या परिस्थितीचा धैर्याने सामना करणे शक्य झाले आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
साखरेचे प्रमाण कमी करा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना साखरेचे सेवन आणि खाद्यतेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केले. अशा छोट्या प्रयत्नांमुळे लोक लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून दूर राहतील, असे ते म्हणाले.
मच्छीमार ‘आत्मनिर्भर भारता’चा भक्कम पाया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाच्या कष्टकरी मच्छीमारांची प्रशंसा केली. मच्छीमार केवळ समुद्राचे योद्धे नसून आत्मनिर्भर भारताचा भक्कम पाया आहेत. ते आपल्या कुटुंबांना तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी पहाटेच्या आधी समुद्राच्या लाटांना धैर्याने सामोरे जातात. असे ते म्हणाले. बंदरांचा विकास असो किंवा मच्छीमारांसाठी विमा असो, असे अनेक उपक्रम आहेत जे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहेत.
हस्तलिखितांविषयी आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘ज्ञान भारतम् सर्वेक्षण’ उपक्रमावर प्रकाश टाकला; या उपक्रमांतर्गत जुन्या हस्तलिखितांविषयीची माहिती संकलित केली जाते. अशी हस्तलिखिते किंवा दस्तऐवज जर कोणाच्या निदर्शनास आले, तर त्यांच्या योग्य पडताळणीसाठी आणि जतन करण्यासाठी त्याविषयीची माहिती सामायिक करावी, असे आवाहन मोदी यांनी जनतेला केले.
