पीटीआय, नवी दिल्ली : भारताच्या विकासातून जगाला आत्मविश्वास मिळत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. भारत दौर्‍यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट द वेव्हर यांच्याबरोबरच्या भेटीदरम्यान मोदी यांनी जीडीपी दरवाढीची प्रशंसा केली. तसेच यातून जगाला संधी मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

दोन्ही देशांनी व्यापार, संरक्षण, दुर्मीळ खनिजे, प्रदूषणरहित ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट द वेव्हर यांच्यादरम्यान नवी दिल्ली येथे व्यापक चर्चा झाली. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर सहमती झाल्याचे सांगितले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या तिमाहीत देशाने जीडीपी वाढीचा ७.८ टक्के दर गाठल्याचा मुद्दा अधोरेखित केला. भारताचा विकास हा जगासाठी विश्वासाचा स्रोत आणि आणि नव्या संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. तर, भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार हा प्रमुख टप्पा असून भारत व बेल्जियम पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात व्यापक आणि सामरिक संबंध वाढवत असल्याचे बार्ट द वेव्हर यांनी सांगितले.

मोदी म्हणाले की, ‘‘आज जग मोठ्या उलथापालथीच्या कालखंडातून जात आहे. अनेक भागातील संघर्ष कायम आहे. अन्न, इंधन, पुरवठा साखळी अशा प्रत्येक क्षेत्रावर अनिश्चिततेचा परिणाम होत आहे.’’ भारत आणि बेल्जियमदरम्यान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हे एकंदर संबंधांचे महत्त्वाचे स्तंभ आहेत, असे मोदींनी यावेळी सांगितले. ‘‘आमचे सरकार आणि संरक्षण उद्योगांमधील करारांमुळे संरक्षण सहविकास आणि सह-उत्पादन यामध्ये अनेक संधी खुल्या होतील,’’ असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. सेमिकंडक्टरच्या क्षेत्रात बेल्जियमचे नैपुण्य आणि भारताची व्याप्ती एकमेकांना पूरक असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी बेल्जियमच्या राजकुमारी ॲस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियन इकॉनॉमिक मिशनचे शिष्टमंडळ भारत दौर्‍यावर आले होते. त्यावेळी दोन्ही देशांदरम्यान जवळपास ४० करार झाले होते. वेव्हर यांचा दौरा त्याच सहकारवृद्धीचा पुढचा भाग मानला जात आहे.

द्विपक्षीय व्यापाराची स्थिती

बेल्जियम हा युरोपमधील भारताचा महत्त्वाचा आर्थिक भागीदार देश आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार १३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक होता. बेल्जियममधील अँटवर्प हे जागतिक हिरे व्यापाराचे केंद्र असून द्विपक्षीय हिरे व्यापारात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय बेल्जियममधून भारतात लक्षणीय प्रमाणात गुंतवणूक होते. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२५ या कालावधीत त्या देशातून भारतात ४.२ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली होती.

या आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेने आपली गती कायम राखली आहे. गेल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के नोंदवला गेला. आज भारताच्या विकासातून जगाला आत्मविश्वास आणि नव्या संधी मिळत आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान