पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी जी-७ परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेने केलेल्या एका जहाजावरील हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केले. सागरी वाहतूक स्वातंत्र्याचा आदर करायला हवा ही भारताची भूमिका कायम राहिल्याचे मोदींनी यावेळी नमूद केले.
नाविकांची सुरक्षा महत्वाची – मोदी
”सागरी वाहतूक स्वातंत्र्य अबाधित राखले पाहिजे, ही आमची कायमच भूमिका राहिलेली आहे, त्यावर आपण भर द्यायला हवा. जागतिक सागरी व्यापारात भारताचे लाखो खलाशी विविध समुद्रांमध्ये कार्यरत आहेत. त्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे, असे माझे ठाम मत आहे. इराणबरोबरील आगामी करारात नाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन, नाविकांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, असा मला विश्वास आहे,” असे मोदी ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान म्हणाले.
होर्मुझ खुली राहणे आवश्यक – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचललेल्या पावलांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभारही मानले. मोदींनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा देखील यावेळी उल्लेख केला. भारत-अमेरिका संबंधांमध्ये आता एक नवा वेग आणि ऊर्जा दिसून येत असल्याचे नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले. होर्मुझ सामुद्रधुनीबाबत बोलताना, “जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहणे अत्यंत आवश्यक आहे. आखाती देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता नांदेल, अशी मला आशा आहे,” असे मोदी ट्रम्प यांच्याशी बोलताना म्हणाले.
ट्रम्पनी केले मोदींचे कौतुक
फ्रान्समधील एव्हियान येथे जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक बैठक मंगळवारी सकाळी पार पडली. फेब्रुवारी २०२५ मध्ये मोदींनी व्हाईट हाऊस येथे ट्रम्प यांची भेट घेतली होती, त्यानंतर ही पहिलीच भेट आहे. दरम्यान, यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. “पंतप्रधान मोदी हे शांत, संयमी आणि जबरदस्त व्यक्ती आहेत,” असे ट्रम्प म्हणाले.
