PM Modi SCO Summit : रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाला जवळपास चार वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही या दोन्ही देशातील संघर्ष थांबलेला नाही. दोन्ही देश सातत्याने एकमेकांच्या शहरांवर हवाई हल्ले करत आहेत. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा तणाव आहे. या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांनाही बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काही दिवसांपूर्वी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही.
दरम्यान, आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनशी सुरू असलेलं युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे. किर्गिस्तानमधील एससीओ शिखर परिषदेदरम्यान आज (३१ ऑगस्ट) पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली. या भेटीदरम्यान भारत आणि रशिया या दोन्ही देशात द्विपक्षीय चर्चा पार पडली.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्लादिमीर पुतिन यांना शांततेचा संदेश देत महत्वाचं भाष्य करत युक्रेनशी सुरू असलेलं युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे. रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व शांततापूर्ण प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असेल, असंही पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. युद्धाचा प्रत्येक दिवस मानवतेला मागे नेत आहे. त्यामुळे आता सतत चालणाऱ्या युद्धांकडून युद्धाच्या समाप्तीकडे वळलं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी व्लादिमीर पुतिन यांना केलं आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधील संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. युद्धाचा प्रत्येक दिवस मानवतेसाठी हानिकारक असून त्यामुळे जगाची प्रगती होण्याऐवजी अधोगती होत असल्याचं नमूद करत सर्व पक्षांनी शत्रुत्व थांबवावं आणि हा संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, यावर मोदींनी भर दिला.
“आम्ही युक्रेनच्या मुद्द्यावर याआधी सातत्याने चर्चा केली आहे. यापूर्वी जेव्हा आपण (मोदी आणि पुतिन) भेटलो होतो, तेव्हा आपण मला याबाबत सर्व पैलूंबद्दल माहिती दिली होती. आपल्यालाही माहित आहे की, भारत शांततेसाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांचं कायमच समर्थन करतो आणि यापुढेही करत राहील. युद्धात जाणारा प्रत्येक दिवस मानवतेला मागे नेतो, तर शांततेच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल मानवतेमध्ये नवी आशा आणि उत्साह निर्माण करते. अनंत काळापर्यंत चालणाऱ्या युद्धाकडून आता आपण युद्धाच्या समाप्तीकडे वाटचाल केली पाहिजे. मानवतेच्या कल्याणासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर शांततापूर्ण तोडगा काढणं हीच मानवतेची हाक आहे आणि हाच भारताचा संदेश आहे. ‘गांधी’ आणि ‘बुद्धां’ची ही भूमी एकच संदेश देते, तो म्हणजे शांततेचा मार्ग”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
