पीटीआय, बारी (इटली)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा शनिवारी आढावा घेतला. तसेच भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक कॉरिडॉरसह (आयएमईसी) जागतिक मंचावर आणि बहुपक्षीय उपक्रमांमध्ये सहकार्य मजबूत करण्यास दोघांनी सहमती दर्शविली. दक्षिण इटलीच्या अपुलिया येथे दिवसभरातील भेटींनंतर मोदी आणि मेलोनी यांची शुक्रवारी भेट झाली. यादरम्यान मोदींनी जी-७ शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल मेलोनी यांचे आभार मानले.

हेही वाचा >>> युक्रेन शांतता आराखड्यासाठी जागतिक नेते एकत्र

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, की ‘इंडो-पॅसिफिक महासागर इनिशिएटिव्ह फ्रेमवर्क’अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या संयुक्त उपक्रमांसाठी दोन्ही नेते उत्सुक आहेत. मुक्त इंडो-पॅसिफिकसाठी दोन्ही नेत्यांनी आपला सामायिक दृष्टिकोन पूर्ण करण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितले. भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक कॉरिडॉर, महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

वाढत्या व्यापार आणि आर्थिक सहकार्याबद्दल आनंद व्यक्त करताना दोघांनी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दूरसंचार, कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि गंभीर खनिजांमध्ये व्यावसायिक संबंध वाढवण्याचे आवाहन केले.

भारतजपान संबंध वाढवण्याची इच्छा

भारत आणि जपानमधील मजबूत संबंध शांततापूर्ण, सुरक्षित आणि समृद्ध ‘इंडो-पॅसिफिक’साठी महत्त्वाचे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध वाढवण्याची इच्छा व्यक्त केली. चीनचे इंडो-पॅसिफिक प्रदेशातील आक्रमक वर्तन तसेच आपला प्रभाव वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांविरोधात मोदींनी लक्ष वेधले. आमचा देश संरक्षण, तंत्रज्ञान, सेमिकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञानामध्ये एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. आम्ही पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक संबंधांमध्ये वाढ करू इच्छितो, असेही ते म्हणाले.