Congress Reaction on PM Modi Dimagi Naxal Statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून १३ व्यांदा भाषण केले. जनेतला संबोधित करत असताना त्यांनी विकसित भारताचा संकल्प, तरुण आणि महिलांसाठी संदेश दिला. भारतासमोरील आव्हाने आणि त्यावर सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. हे करत असतानाच पंतप्रधान मोदींनी विरोधकनांही लक्ष्य केले. हाती शस्त्र घेतलेली नक्षलवादी चळवळ आम्ही संपवली, पण देशात ‘दिमागी नक्षल’ (नक्षल विचारधारा) पुन्हा डोके वर काढत आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. या टिप्पणीवर आता काँग्रेसचे नेते, खासदार जयराम रमेश यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राजकीय विरोधकांना बदनाम करण्यासाठी पंतप्रधान मोदी अशा विशेषणांचा वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून अशा शब्दांचा वापर करणे हे त्यांच्या हताशपणाचे लक्षण असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे माध्यम प्रभारी आणि राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी यापूर्वी आपल्या विरोधकांसाठी शहरी नक्षलवादी हा शब्द वापरला होता. आता ते त्यांना दिमागी नक्षलवादी म्हणत आहेत. निश्चितच हे त्यांच्या हताशतेचे लक्षण आहे.”

काय म्हणाले जयराम रमेश?

जयराम रमेश यांनी पुढे म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समग्र राज्यशास्त्रात एमए केले आहे. त्यांचे एमए म्हणजे ‘मास्टर अब्युजर’ असावे. याशिवाय शहरी नक्षलवादावर भाजपानेच घुमजाव केले असल्याची आठवण जयराम रमेश यांनी करून दिली. ते म्हणाले, दोन-तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी राजकीय विरोधकांना अर्बन नक्षलवादी (शहरी नक्षली) म्हटले होते. त्यावेळी अमित शाह यांना संसदेत शहरी नक्षलवादाची व्याख्या काय आहे? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, शहरी नक्षलवादी असे काही नसते आणि त्याची कोणतीही व्याख्या नाही.

जयराम रमेश यांनी पुढे म्हटले की, पंतप्रधान मोदींनी पूर्वी ज्यांना शहरी नक्षलवादी म्हटले होते, त्या लोकांनी उपस्थित केलेले अनेक मुद्दे आणि मागण्या नंतर मान्य केल्या होत्या. जयराम रमेश पुढे म्हणाले, “ज्या लोकांनी त्यांनी शहरी नक्षलवादी म्हटले, त्यांच्याच सूचना नंतर स्वीकारल्या. जातनिहाय जनगणनेची संकल्पना शहरी नक्षलवादी म्हणून सुरुवातीला फेटाळण्यात आली. मात्र वर्षभरापूर्वी त्यांनी जातीआधारित जनगणनेची घोषणा केली.”

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात सत्तेमध्ये माओवादी विचारसरणीचे लोक जागा अडवून बसले होते. सरकारी संस्थांमध्येही सल्लागाराच्या भूमिकेत हे माओवादी लोक होते. आम्ही जंगलातील सशस्त्र नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आणि देशाला त्या संकटातून मुक्त करण्यात यशस्वी झालो. जंगलातील सशस्त्र नक्षलवादी संपले असले तरी शहरातील ‘दिमागी नक्षल’ अजूनही शिल्लक आहेत. ही मानसिकता बाळगणारे लोक संधीची वाट पाहत आहेत.

“हिंसा आणि अराजकता निर्माण करण्यासाठी दिमागी नक्षल मार्ग शोधत आहेत. समाजाला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी ते विविध डावपेच आखत आहेत. आपण या दिमागी नक्षल्यांना ओळखले पाहिजे. आपल्याला त्यांना वेगळे पाडण्याची आणि देशातील तरुणांना देशाला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहातील प्रयत्नांशी जोडण्याची गरज आहे”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.