पीटीआय, हेग

‘‘सध्या जग अनेक आव्हानांचा सामना करत आहे. आधी करोना, मग युद्धे आणि आता ऊर्जासंकट आल्याने हे दशक जगासाठी आपत्तींचे दशक बनले आहे. परिस्थितीत जर लवकर सुधारणा झाली नाही, तर गेल्या अनेक दशकांतील यश वाया जाईल आणि जगातील लोकसंख्येचा एक मोठा भाग गरिबीच्या खाईत लोटला जाईल,’’ अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केली.

नेदरलँडमधील हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी जागतिक संकटावर भाष्य केले. सध्याच्या काळाला ‘आपत्तींचे दशक’ असे त्यांनी संबोधले. जगभरातील अर्थव्यवस्थेला बाधा आणणार्‍या अनेक जागतिक संकटांकडे त्यांनी लक्ष वेधले. वाढत्या जागतिक व्यत्ययांना तोंड देण्यासाठी भारत आणि नेदरलँड विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यासाठी सज्ज पुरवठा साखळ्या तयार करण्याकरिता

सध्याचे दशक आपत्तींचे!

एकत्र काम करत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. दोन्ही देश आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर अधिक जवळून समन्वय साधू शकतात आणि व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण व अपारंपरिक ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी नेदरलँडचे राजे विलेम- अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

‘भारत संधींची भूमी’

‘‘२१ व्या शतकातील भारत ही संधींची भूमी आहे. भारत जितका प्राचीन आहे, तितकाच आधुनिकही होत आहे. देश अभूतपूर्व परिवर्तनातून जात असून त्याच्या आकांक्षा आता सीमांपुरत्या मर्यादित नाहीत. भारतातील आपल्या मूळ गावांशी संपर्क साधण्याची आणि विकसित भारताच्या प्रवासात सहभागी होण्याची हीच वेळ आहे,’’ असे मोदी यांनी भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची माहितीही दिली.  

चोल राजवंशाचा ताम्रपट परत

’नेदरलँडने ११व्या शतकातील अनाईमंगलम ताम्रपट भारताला परत केला. चोल राजवंशाच्या काळातील हा सर्वात महत्त्वपूर्ण दस्तावेजांपैकी एक मानला जातो.

’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यावेळी नेदरलँड्स सरकारने हा ताम्रपट परत केल्याची घोषणा केली. अनाईमंगलम ताम्रपटांमध्ये २१ मोठे आणि तीन लहान ताम्रपटांचा संच आहे, ज्यांचे एकूण वजन सुमारे ३० किलोग्रॅम आहे.

’ चोल शासक राजाराजा पहिला याने तमिळनाडूच्या नागपट्टीनम येथील चुडामणी विहार या बौद्ध मठाला दिलेल्या दानाची माहिती या ताम्रपटात आहे. डच वसाहत काळात म्हणजे ३०० वर्षांपूर्वी हे ताम्रपट युरोपमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर नेदरलँडच्या लाइडेन विद्यापीठामध्ये ते जतन करण्यात आले होते.

आज मानवजातीसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. जग नव्या आव्हानांना तोंड देत आहे. आधी करोना महासाथ आली; त्यानंतर युद्धे सुरू झाली आणि आता ऊर्जेचे संकट आहे. हे दशक जगासाठी आपत्तींचे दशक ठरत आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान