पीटीआय, द हेग

भारत आणि नेदरलँडमधील संबंध आता सामरिक भागीदारीच्या स्तरावर नेण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यात नेदरलँडबरोबर १७ करार करण्यात आले. संरक्षण, दुर्मीळ खनिजे आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांत हे करार करण्यात आले. या दौर्यानंतर मोदी यांचे स्वीडन येथे आगमन झाले असून, नॉर्वे आणि इटलीलाही पंतप्रधान जाणार आहेत.

 पंतप्रधान मोदी आणि नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यात स्थानिक वेळेनुसार, शनिवारी सायंकाळी चर्चा झाली. नवनिर्मिती, आरोग्य, कृषी, जलव्यवस्थापन, हवामान बदल, ऊर्जा, सागरी विकास यांमध्ये दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढविण्यात येणार आहे.

पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जापुरवठा साखळी विस्कळीत झाल्यावर दोन्ही नेत्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. होर्मुझ सामुद्रधुनीतून मुक्त व्यापार होऊ दिला पाहिजे, अशी भूमिका संयुक्त पत्रकात मांडण्यात आली. युक्रेन युद्ध आणि त्यातील जीवितहानीवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जेटन यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा या वेळी निषेध केला.

दरम्यान, भारतात माध्यमांचे स्वातंत्र्य कमी होत असल्याचा, तसेच धार्मिक व अल्पसंख्याकांचे हक्क याचा र्हास होत असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी फेटाळून लावला. भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी होत असल्याबद्दल जेटन यांनी कथितरित्या चिंता व्यक्त केल्याबद्दल एका प्रश्नाला उत्तर देताना जॉर्ज म्हणाले, ‘‘भारतामध्ये जिवंत लोकशाही असून सर्वांना भाषणस्वातंत्र्य आहे.’’

द्विपक्षीय सामरिक भागीदारी आराखडा

मोदी-जेटन यांच्यातील चर्चेनंतर भारत-नेदरलँडमध्ये ‘सामरिक भागीदारी आराखडा’ सादर करण्यात आला. त्यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, सेमीकंडक्टर, अवकाश, एआय आणि क्वांटम कम्प्युटिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यात येणार आहे. हरित ऊर्जेसाठीही (ग्रीन हायड्रोजन) दोन्ही देशांत सहकार्य करण्याचे ठरले आहे. संरक्षण साहित्याचे संयुक्त उत्पादन, तंत्रज्ञानाचे हस्तांतर यामध्येही भविष्यात सहकार्य करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी मान्य केले.

माझ्या नेदरलँडच्या भेटीत भारत-नेदरलँडच्या संबंधांना नवी चालना मिळाली. हे संबंध सामरिक भागीदारीच्या स्तरावर नेण्यात आले असून, जलसंसाधने, सेमीकंडक्टर, नवनिर्मिती, संरक्षण या क्षेत्रात सहकार्य होणार आहे. भविष्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आम्ही आखल्या आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान