पीटीआय, नोएडा

“जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी नागरिकांनी समर्पण आणि ऐक्याने काम करावे,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत बोलताना पंतप्रधानांनी इस्रायल-अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.

‘विकसित भारता’चे ध्येय साध्य करण्यासाठी १.४ अब्ज नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे युद्धाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले. सरकार देशाच्या हितसंबंधांना प्राधान्य देत असून शेतकऱ्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करत असल्याचे मोदींनी सांगितले. युद्ध परिस्थितीवर आपण संसदेत विस्ताराने चर्चा केली आहे आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही सकारात्मक विचारविनिमय केला आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. युद्धग्रस्त प्रदेशातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूवर भारत अवलंबून आहे, यावर भर देत मोदी म्हणाले, “शेतकरी आणि कुटुंबांवर याचा बोजा पडणार नाही याची खबरदारी घेत सरकार आवश्यक पावले उचलत आहे.”

या संकटसमयी राजकीय पक्ष बेजबाबदार विधाने करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले, “जे देशाचे नुकसान करणारी टिप्पणी करतात त्यांनी राजकीय चर्चांमध्ये काही गुण मिळू शकतात, पण अशा कृत्यांना जनता कधीही माफ करत नाही.” करोना महासाथीदरम्यान चुकीच्या माहितीचा प्रसार केला गेला होता, असा दावा करत मतदारांनी त्यांना नाकारले होते, अशी टीका मोदींनी केली.

मी देशातील जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की, आपण या संकटाला शांतपणे, संयमाने आणि ऐक्याने तोंड दिले पाहिजे. हे जागतिक संकट आहे, पण आपण देशाच्या हितसंबंधांना प्राधान्य दिले पाहिजे. ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

विरोधकांवर टीका

समाजवादी पक्षाने नोएडाचा वापर एटीएमसारखा केला, पण भाजपची सत्ता असताना नोएडाचा विकासाचे शक्तिशाली इंजिन म्हणून उदय होत आहे, असे मोदी म्हणाले. यापूर्वीच्या सरकारांनी नोएडाकडे दुर्लक्ष केले, मात्र आता हे शहर जगाचे स्वागत करायला तयार आहे, असा दावा मोदींनी केला.