PM Narendra Modi pays tribute on the first anniversary of the Pahalgam terror attack : वर्षभरापूर्वी काश्मिरच्या पहलगाम खोऱ्यात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. या हल्ल्यात देशभरातील २६ पर्यटक मृत झाले. हा दिवस भारतासाठी काळा दिवस असून या हल्ल्याला आज एक वर्ष होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पहलगाम हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली आणि “त्यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही,” असे म्हटले. ‘X’ (ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, “गेल्या वर्षी आजच्याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांचे मी स्मरण करतो. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दु:खातून सावरणाऱ्या शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी माझ्या सहवेदना आहेत.”
पंतप्रधान पुढे म्हणाले, “एक राष्ट्र म्हणून आम्ही या दु:खात आणि संकल्पात एकत्र उभे आहोत. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे क्रूर मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत.”
गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ लोकांची हत्या केली होती, .यात प्रामुख्याने पर्यटकांचा समावेश होता. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी पहाटे लष्करी मोहीम सुरू केली आणि पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेने दहशतवादी धमक्या मोडीत काढल्या, पुढील आक्रमकता रोखली आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा पुनरुच्चार केला.
भारताविरोधी कृत्यांना चोख प्रत्युत्तर देणार
भारतीय लष्करानेही बुधवारी ‘X’ वर इशारा दिला की, राष्ट्राविरुद्धच्या कोणत्याही गैरकृत्याला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल. “भारताविरुद्धच्या कृत्यांना चोख प्रत्युत्तर नक्कीच दिले जाईल. न्याय मिळवून दिला जाईल”, असे लष्कराच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या पोस्टमध्ये ‘ऑपरेशन महादेव’ चे एक छायाचित्र देखील जोडले होते, ज्यावर लाल रंगात “ही केवळ वेळेची बाब होती” (It was only a matter of time) अशी ओळ लिहिली होती, जी हल्लेखोरांच्या शोधाचा निर्धार दर्शवते. २२ एप्रिलच्या घटनेनंतर लगेचच सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत दाचीगाम/महादेव रिजजवळील दुर्गम हिमालयीन प्रदेशात शोधमोहीम राबवण्यात आली. ९३ दिवसांच्या कालावधीत, सुरक्षा दलांनी ३०० चौरस किमीपेक्षा जास्त परिसर पिंजून काढला आणि अखेर तीन मुख्य दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना कंठस्नान घातले.
