नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणातील आर्थिक सुधारणांचा धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्र सरकार आता आर्थिक सुधारणांच्या गतिमान मार्गावर धावत आहे, असा विश्वास व्यक्त केला. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हीच ‘एनडीए’ सरकारची ओळख असल्याचेही मोदी म्हणाले.

संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या आवारात मोदी यांनी पत्रकारांसमोर मत व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी सुरू झाले असले तरी, राष्ट्रपतींच्या अभिभाषणामुळे मोदींनी एक दिवस उशिरा गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला.

मोदींनी तीन दिवसांपूर्वी युरोपियन युनियनशी झालेल्या मुक्त व्यापार कराराचा आवर्जुन उल्लेख केला. हा करार म्हणजे ‘सर्व करारांची जननी’ असून आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वोत्तम दर्जाची उत्पादने नेण्याची ऐतिहासिक संधी भारतीय व्यापार्यांना मिळणार आहे. हा करार देशातील तरुणांचे उज्ज्वल भविष्य करण्याची क्षमता असलेला तसेच, भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणारा असेल, असे मोदी म्हणाले.

देशी बनावटीच्या वस्तू कमी खर्चात ‘युरोपियन युनियन’च्या २७ देशांमध्ये पोहोचतील. त्यामुळे आता उद्योजकांनी आत्मसंतुष्ट न राहता जागतिक दर्जाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे. त्यातूनच जागतिक बाजारपेठा व ग्राहकांचा विश्वास जिंकता येईल, असे मोदी म्हणाले. हा व्यापार करार भारताला अधिक आत्मविश्वासू, स्पर्धात्मक आणि दर्जेदार उत्पादक बनवेल, असाही आशावाद मोदींनी व्यक्त केला.

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचे आहे. २१ व्या शतकाचा एक चतुर्थांश भाग उलटून गेला आहे. ही दुसर्या तिमाहीची सुरुवात आहे. त्यामुळे खासदारांनी या अधिवेशनाकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन मोदींनी केले.

संसद म्हणजे ‘लोकशाहीचे मंदिर’ आहे. भारत जगासाठी आशेचा किरण म्हणून उदयास येत आहे. सध्याची वेळ अडथळे निर्माण करण्याची नसून संकल्प करण्याची आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान.