PM Modi Parliament March violence reaction : दिल्लीत संसद मोर्चादरम्यान झालेला हिंसाचार अवघ्या देशाने पाहिला. कॉकरोच जनता पार्टीने नियोजित केलेल्या या मोर्चाला देशभरातून हजारो विद्यार्थी आले होते. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हे विद्यार्थी एकत्र जमले होते. मात्र, त्यांच्यावर दिल्ली पोलिसांकडून बेदम लाठीमार करण्यात आला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला. यामध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत. यातच आज एनडीएच्या मित्रपक्षांची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत या आंदोलनाबाबत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी दिली.

गेल्या महिन्याभरापासून जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन छेडलं आहे. तर, गेल्या २३ दिवसांपासून सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं आहे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाही त्यांनी उपोषण सुरू ठेवलं आहे. दरम्यान, संसद मोर्चादरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आल्याने आंदोलक अधिक पेटले आहेत. त्यांनी आजही संसदेवर मोर्चाचं आयोजन केलं आहे. या दरम्यान, संसदेतच एनडीएच्या मित्र पक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी कालच्या प्रकरणावरही भाष्य केल्याचं किरण रिजीजू म्हणाले.

मोदी म्हणाले, पुन्हा पेपर लीक होऊ नये!

कालच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीत काही भाष्य केलं का? असा प्रश्न पत्रकारांनी किरण रिजीजू यांना विचारला असता ते म्हणाले, नीट पेपर लीकची बातमी आली तेव्हाच सरकारने कारवाई केली. १३ लोकांना अटक करून तुरुंगात डांबलं आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पुनर्परिक्षेला प्राधान्य देण्यात आलंय. त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली आहे. निकालही वेळेत लागला. पुन्हा पेपर लीक होणार नाही, याकरता सक्तीची पावलं उचलली आहेत. मोदींनी अपील केलं आहे की दोषींवर कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे. याकरता मोठ्या वकिलांनीही सहकार्य करावं. पुन्हा पेपर लीक होऊ नयेत म्हणून जी पावलं उचलली आहेत, त्याची माहितीही मोदींनी दिली.”

विरोधकांनो, तरुणांच्या भविष्यासाठी काम करूया

“पेपर लीक एका राज्याचा मुद्दा नाहीय. फक्त केंद्राचा मुद्दा नाहीय. जे लोक यात सहभागी आहेत, त्या प्रत्येकाला शिक्षा देण्याकरता एकत्र यायला हवं, हा देशाचा विषय आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ होऊ नये. फुलप्रुक काम करण्याच्या सूचना पंतप्रधानांकडून देण्यात आल्या आहेत. आता जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, यात एनडीए सकारात्मक भूमिका निभावणार आहे. जे विधेयक आणले आहेत, एनडीए एकजुटीने पारीत करणार आहोत. विरोधकांनाही आमचं आवाहन आहे, की मतभेद असू शकतात, पण देशाच्या आणि तरुणांच्या भविष्यासाठी आपण काम करूया. याकरताच आपण निवडून आलो आहे”, असं किरण रिजीजू म्हणाले.

धुरंदर वकिलांची नियुक्ती

बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनुसार इंडियन एक्स्प्रेसने वृत्ता म्हटलंय की, पंतप्रधान मोदींनी निदर्शनास आणून दिलं की, परीक्षेच्या प्रकरणामुळे मुलांना गैरसोय झाली असली तरी, फेरपरीक्षा विनाविलंब पार पडली इतकंच नाही, तर दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकारने धुरंदर वकीलही तैनात केले होते.