पीटीआय, नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन रचनात्मक असावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. तर्क आणि तथ्यांच्या आधारे संसदेच्या सभागृहांमध्ये चर्चा झाल्या तर गोंधळ होण्यास किंवा आरडाओरडा करण्यास वावच उरणार नाही, असे मोदी म्हणाले. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला.

अधिवेशनादरम्यान पेपरफुटी, राम मंदिर देणग्या अपहार प्रकरण आणि ई-२० इथेनॉलमुळे जनतेत असलेली नाराजी या मुद्द्यांवरून विरोधक केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, अधिवेशनात रचनात्मक कामकाज व्हावे अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

‘नेहमीच्या पोकळ गप्पा’

दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले टिप्पणी म्हणजे त्यांच्या ‘नेहमीच्या पोकळ गप्पा’ होत्या, अशी टीका काँग्रेसने केली. मोदींनी राम मंदिर देणग्या अपहार, पेपरफुटी आणि विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याच्या गलिच्छ क्लृप्त्या या मुद्द्यांना स्पर्श केला नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.