PM Modi Lok Sabha speech on Indian Security : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या विशेष सत्रात पश्चिम आशियातील (Middle East) वाढत्या संघर्षावर भाष्य करताना भारतीय सुरक्षा आणि धोरणात्मक भूमिकेवर मोठे विधान केले आहे. पंतप्रधानांनी सभागृहात स्पष्ट केले की, पश्चिम आशियातील परिस्थिती केवळ त्या क्षेत्रापुरती मर्यादित नसून त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहेत. समुद्रापासून जमिनीपर्यंत भारताच्या सीमा आणि व्यापारी मार्ग (Trade Routes) सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना चोवीस तास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

“पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर आधीच भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम आशियातील सर्व देशातील संबंधित नेत्यांशी मी चर्चा केली आहे. मी स्वतः हा तणाव कमी करून थांबवण्याचा आग्रह केला आहे. भारताने भारतीय नागरीक, ऊर्जा आणि वाहतुकीशी संबंधित हल्ल्यांचा विरोध केला आहे. व्यावसायिक जहाजांवरील हल्ला आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील बंदी अस्वीकार्य आहे. भारत डिप्लोमसीप्रमाणे युद्धाच्या परिस्थितीतही जहाजांच्या हालचालींकरता निरंतर प्रयत्न करत आहे. भारत प्रत्येकवेळी मानवतेच्या हिताकरता आणि शांतीच्या बाजूने आवाज उठवत राहिला आहे. संवाद आणि कुटनीतीतच या समस्येचं समाधान आहे. आमचा प्रत्येक प्रयत्न तणाव कमी करून संघर्ष संपवण्यासाठी आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले.

सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

“या युद्धात कोणत्याही जीवनावरील संकट मानवतेच्या हिताचे नाही. त्यामुळे भारताचा प्रयत्न सर्व पक्षांना लवकरात लवकर शांतीपूर्व समाधानाकरता प्रोत्साहित करत आहे. असे संकट येतात तेव्हा काही तत्त्वे याचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे. सागरी सुरक्षा, सीमा सुरक्षा, सायबर सुरक्षा मजबूत केल्या जात आहेत”, अशी माहिती मोदींनी दिली.

करोनाप्रमाणे आताही एकजूट राहावं लागेल

“या युद्धामुळे जगातील कठीण परिस्थिती दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला तयार राहावं लागेल आणि एकजूट राहावं लागेल. आपण करोनाच्या वेळीही एकजुट राहून काम केलं. आताही त्याचप्रमाणे तयार राहण्याची गरज आहे. संयम, धैर्याने, शांत मनाने सामना करायचा आहे. हीच आपली ओळख आहे”, असंही खास आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.