जगभरातील करोना व्हायरसचा धोका अद्याप संपलेला नाही. यासाठी अमेरिकेनं आज दुसऱ्या ग्लोबल कोविड-१९ शिखर परिषदेचे आयोजन केलं आहे. यामध्ये करोनाच्या आणि भविष्यातील आरोग्य आव्हानांना कसे तोंड द्यावे लागेल, यावर चर्चा होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी दुसऱ्या ग्लोबल कोविड व्हर्च्युअल परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लोबल कोविड १९ परिषदेला संबोधित करणार आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान मोदी या परिषदेत सहभागी होणार आहेत. करोना महामारीच्या आव्हानांचा सामना कसा करायचा यावर या परिषदेत चर्चा होणार आहे. करोना महामारीविरुद्धच्या लढाईत भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, भारत जगाला सुरक्षित आणि कमी किमतीच्या लसींचा पुरवठा करत आहे. लसीव्यतिरिक्त, भारत औषध आणि इतर सर्व मदत पुरवत आहे.
कोविड संदर्भात आयोजित परिषदेत अनेक देश, एनजीओ, खासगी क्षेत्रातील कंपन्या सहभागी होतील. यात दक्षिण अफ्रिका, भारत, कॅनडा, जापान, कोलंबिया, कोरिया रिपब्लिक, नायजेरिया, नॉर्वे, पलाऊ, टांझानिया, रवांडा, इटली, न्यूझीलंड, युरोपियन कमिशन, स्पेन, रोटरी इंटरनॅशनल आणि इतरांचा सहभाग असणार आहे. ही जागतिक शिखर परिषद व्हर्च्युअल माध्यमातून होणार आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी भारतात कोरोना संसर्गाची २,५०५ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याचवेळी ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एकूण प्रकरणांची संख्या ४३,११२,६९० आहे, तर एकूण मृत्यूंची संख्या ५,२२,८६४ आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या ४२,५५७,९३९ आहे.