PM Modi Xi Jinping BRICS Summit 2026 : गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत ब्रिक्स परिषद सुरू आहे. जगभरातील अनेक नेते आणि प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःहून प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या परिषदेतील अनेक व्हिडिओही आता समोर येऊ लागले आहेत. एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भाषणादरम्यान सगळ ठीक आहे ना असा प्रश्न विचारला.
भारत मंडपममध्ये ब्रिक्स परिषद आयोजित करण्यात आली. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत होते. दरम्यान, त्यांनी भाषण थांबवून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना ‘Is It Okay? असा प्रश्न विचारला. हे भाषण सुरू असताना भारत मंडपममधील कॅमेरा झूम आऊट झाला. त्यामुळे पंतप्रधानांनी असा प्रश्न नेमका कशासाठी विचारला हे स्पष्ट होऊ शकलं नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अस्वस्थ दिसत असल्याचं लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण थांबवलं असल्याचं वृत्त द इंडियन एक्स्प्रेसच्या हिंदी विभागाने दिलं.
भाषणानंतर झाली द्विपक्षीय बैठक
‘दूरदर्शन’ने शेअर केलेल्या या भाषणाच्या फुटेजमध्ये ४.३० ते ५ मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडल्याचं दिसतंय. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली, जी सात वर्षांनंतर भारतीय भूमीवर झालेली त्यांची पहिलीच भेट होती. शी जिनपिंग यांनी यापूर्वी २०१९ मध्ये भारताला भेट दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी “दोन्ही देशांनी आपल्या संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे”, यावर पुन्हा एकदा भर दिला.
पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केलं की, “मतांतरांचे रूपांतर वादात होऊ नये” आणि दोन्ही बाजूंनी “परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हित” या तत्त्वांचं पालन केलं पाहिजे. पंतप्रधान मोदींनी यावरही जोर दिला की, सीमावर्ती भागातील शांतता आणि सौहार्द हे द्विपक्षीय संबंधांच्या निरंतर विकासासाठी अत्यंत आवश्यक आधार आहेत. तसंच सीमासंबंधी मुद्द्यांवर सध्याचे करार आणि सामंजस्य पाळण्याची दोन्ही बाजूंना गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या गाला डिनरलाही अनुपस्थित राहिले होते. त्यांच्या गैरहजरीमुळेही विविध चर्चा रंगल्या.
