PM Modi Talk To Venezuela Acting President : अमेरिकेने काही दिवसांपूर्वी लॅटिन अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशावर मोठा हवाई हल्ला केला होता. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक केलं होतं. निकोलस मादुरो हे अद्यापही अमेरिकेच्या ताब्यात आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती.
अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील सर्व घडामोडीच्या काही दिवसानंतर आता व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. व्हेनेझुएला आणि भारत या दोन्ही देशातील द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यासाठी डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सहमती दर्शविली असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधल्यानंतर व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी म्हटलं की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये आमची द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ आणि विस्तारित करण्यास सहमती दर्शविली आहे. भारताच्या लोकांनी आमच्या देशाप्रती दाखवलेल्या एकजुटीबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पंतप्रधान मोदींनी व्हेनेझुएलाच्या लोकांच्या शांततेसाठी आणि सार्वभौमत्व व स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी बरोबर असल्याचं सांगितलं”, असं डेल्सी रॉड्रिग्ज यांनी म्हटलं.
निकोलस मादुरो यांना कसं पकडलं?
अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर रात्रीच्या वेळी हल्ला केला होता. अमेरिकन सैन्यांनी कारवाई केल्यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला रात्री त्यांच्या बेडरूममधून अमेरिकन सैन्यांनी ताब्यात घेतलं होतं. निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हा ते कराकसमधील अतिशय कडक सुरक्षा असलेल्या एका लष्करी संकुलात झोपलेले होते. मात्र, तरीही अमेरिकन सैन्यांनी त्यांना ताब्यात घेतलं.
अमेरिका-व्हेनेझुएलामध्ये वाद कशामुळे?
अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश असलेल्या व्हेनेझुएलाचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणले गेले आहेत. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दुसरीकडे- व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे ड्रग्ज तस्करीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. यादरम्यान त्यांनी व्हेनेझुएलावर अनेक निर्बंधदेखील लादले आहेत. गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेचे हे पाऊल वसाहतवादी असल्याची टीका व्हेनेझुएलाकडून करण्यात आली होती.
मादुरो नेमके आहे तरी कोण?
निकोलस मादुरो यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी व्हेनेझुएलाची राजधानी काराकस येथे झाला. राजकारणात येण्यापूर्वी ते बसचालक म्हणून काम करीत होते. त्यांनी व्हेनेझुएलाच्या परिवहन विभागात कामगार संघटनेचे नेते म्हणून आपला राजकीय प्रवास सुरू केला. मादुरो हे व्हेनेझुएलाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष ह्यूगो चॅव्हेझ यांचे निष्ठावान शिष्य मानले जातात. त्यांनी सुरू केलेल्या ‘बोलिव्हेरियन क्रांती’मध्ये मादुरो यांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता. १९९९ मध्ये चॅव्हेझ सत्तेत आल्यानंतर मादुरो यांनी त्यांच्या सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. २००६ ते २०१३ पर्यंत ते परराष्ट्र मंत्री होते आणि २०१२ मध्ये मादुरो उपराष्ट्राध्यक्ष झाले.

