PM Narendra Modi Hero Pilot Praise Indian Pilot : दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबई विमानाचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सह-वैमानिकाशी लढा देणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर सध्या कौतुकाचा आणि विशेषणांचा वर्षाव होत आहे. आज सकाळीच या भारतीय वैमानिकाला हिरो म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आणखी कौतुक करताना, “एका भारतीयाने ९/११ सारखा हल्ला रोखला”, असं म्हटलं आहे.

“एका भारतीयाने ९/११ सारखा हल्ला रोखला”

काल घडलेल्या घटनेत भारताचे कॅप्टन स्मित यांनी विलक्षण संयम, समयसूचकता आणि शौर्य दाखवले; खरोखरच, इस्रायलच्या पंतप्रधानांनी आज म्हटल्याप्रमाणे, एका भारतीयाने ९/११ सारखा हल्ला रोखला”, असं पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना सांगितले.

स्मित यांच्या पराक्रमामुळे आपल्याला सर्वांना त्यांचा अभिमान आहे. आज त्यांचे वडील भुपेंद्रभाई, त्यांची आई गीताताई आणि पत्नी सोनल यांच्याबरोबर मी संवाद केला. आज संपूर्ण जग त्यांच्यावर गर्व करत आहेत. आपण सर्वजण स्मितच्या दीर्घायुष्य आणि उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करूयात. स्मितचं अभिनंदन करूयात”, असंही मोदी म्हणाले.

बिन्यामिन नेतान्याहू काय म्हणाले होते?

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी जखमी भारतीय वैमानिकाच्या “असाधारण शौर्याबद्दल” कौतुक केलं आणि सांगितलं की, त्यांनी सह-वैमानिकाशी लढा देऊन हवेतील एक मोठा भीषण अपघात रोखला. “त्या भारतीय वैमानिकाचे आणि त्यांना मदत करणाऱ्या लोकांचे हे एक अद्भूत शौर्य कृत्य आहे. त्यांनी जागतिक पातळीवर पोहोचू शकणारे एक मोठे संकट रोखलं”, असं नेतान्याहू म्हणाले.

मोदींनी सकाळीही केली होती अभिनंदनपर पोस्ट

पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटलं, “कॅप्टन मच्छार हे खरे हिरो आहेत. सर्वात मोठ्या संकटाचा सामना करताना आणि स्वतः गंभीर जखमी झालेले असतानाही, कॅप्टन स्मित मच्छार यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी अपार धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला. त्यांच्या या शौर्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आणि एक मोठी दुर्घटना टळली. संपूर्ण भारताला कॅप्टन मच्छार यांचा अभिमान आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना.”