पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या भाषणाचे कौतुक केले. चालू वर्षाचा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिवर्तनासाठी कसा हातभार लावेल, याचे सर्वसमावेशक चित्र त्यांनी मांडले असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले की, ३१ मार्च रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारने एकूण ५३.४७ लाख कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन केले आहे, जे ७.७ टक्क्यांनी अधिक आहे. प्रभावी भांडवली खर्च वाढून १७.१ लाख कोटी रुपये झाला आहे, जो जीडीपीच्या ४.४ टक्के आहे, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त, सरकार वित्तीय शिस्तीचे पालन करत असून २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट जीडीपीच्या ४.३ टक्के किंवा १६.९५ लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. ‘कर्ज-ते-जीडीपी’ गुणोत्तर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे हा वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन (एफआरबीएम) कायद्याचाच एक भाग असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले, ‘लोकसभेतील आपल्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प आपल्या राष्ट्राच्या आर्थिक परिवर्तनात कशा प्रकारे योगदान देईल, याचे सर्वसमावेशक चित्र मांडले. त्यांनी ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’, ‘एमएसएमई’ क्षेत्राला पाठबळ, कौशल्य विकास, पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांना चालना, तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील प्रयत्नांवर भर दिला.’
