BRICS Summit 2026 : दिल्लीत १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ पार पडत आहे. या ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी अनेक देशांचे प्रमुख सहभागी झाले आहेत. यामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांच्यासह आदी देशांचे प्रमुख नेते या ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेले आहेत. या ब्रिक्स परिषदेच्या बैठकीला आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते औपचारिकपणे सुरुवात झाली आहे.

या बैठकीत विविध जागतिक विषयांवर चर्चा होत आहेत. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेमधील एका खास फोटोची जगभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या फोटोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे दिसत आहेत. ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या दरम्यान झालेल्या एका चर्चेदरम्यानचा हा फोटो आहे. हा फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे.

मोदी, पुतिन अन् जिनपिंग यांच्या फोटोची चर्चा का?

‘ब्रिक्स’ शिखर परिषदेमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्या या खास फोटोची चर्चा होत आहे. हा फोटो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यानचा आहे. या फोटोत पंतप्रधान मोदी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मध्ये उभे असल्याचं दिसत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी हे व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. या फोटोत तिनही नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. मोदी, पुतिन आणि जिनपिंग यांच्या या खास फोटोमधून काही संदेश देण्याचा प्रयत्न आहे का? याची देखील चर्चा होत आहे.

मध्य पुर्वेत आणि युक्रेन युद्धांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत या शिखर परिषदेचं यजमानपद भूषवत आहे. असं असतानाच मोदी, पुतिन आणि जिनपिंग यांचा हा खास फोटो समोर आला आहे. यातच अमेरिका आणि पाश्चात्य मित्रराष्ट्रांबरोबरची भागीदारी कायम राखत असतानाच रशिया आणि चीनबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यासाठीही भारत प्रयत्नशील आहे.

दुसरीकडे शी जिनपिंग हे सात वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा होणार असून सीमावाद, व्यापार आणि गुंतवणूक हे विषय चर्चेच्या अजेंड्यावर असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांचाही हस्तांदोलन करतानाच्या एका फोटोची मोठी चर्चा सुरू आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा आणि सागरी व्यापार विस्कळीत झाला असताना या फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे. पुतिन यांच्याबरोबरच्या चर्चेप्रमाणेच पंतप्रधान मोदींनी इराणच्या अध्यक्षांबरोबरच्या भेटीदरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचं आवाहन केलं आहे.