PM Modi congratulates Team India on 2026 T20 World Cup win भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शाह अशा अनेक प्रमुख नेत्यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. नेत्यांनी खेळाडूंचे कौशल्य, सांघिक कामगिरी आणि अदम्य जिद्दीचे कौतुक करत हा क्षण देशवासियांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “चॅम्पियन्स! आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन! हा उल्लेखनीय विजय असाधारण कौशल्य, दृढनिश्चय आणि सांघिक कामगिरी दाखवून देतो. संपूर्ण स्पर्धेत संघाने विलक्षण धैर्य दाखवले आहे. या विजयाने प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमान आणि आनंदाने भरून आले आहे.”
राहुल गांधी काय म्हणाले…
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी या विजयाचे श्रेय संजू सॅमसन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना दिले आणि संपूर्ण संघाच्या कौशल्याचे कौतुक केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “पुन्हा एकदा चॅम्पियन्! आपल्या भारतीय संघाचा हा एक शानदार विजय आहे. विशेषतः संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांनी संपूर्ण स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक. घरच्या मैदानावर ट्रॉफी राखल्याबद्दल आणि देशाला आणखी एक अविस्मरणीय क्षण दिल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन!”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतो. त्यांनी देखील भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. “काय हा शानदार विजय…!! विश्वविजेत्या टीम इंडियाला सलाम! संपूर्ण स्पर्धेतील तुमची असामान्य कामगिरी आणि दृढनिश्चयाने देशाला सन्मान आणि अभिमान मिळवून दिला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केल्याबद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन.”
भारताचा दणदणीत विजय
अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने टी२० वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचा पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरले आहे. यापूर्वी २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने जेतेपदाची पटकावले होते. आतापर्यंत कोणत्याच संघाला जेतेपद कायम राखता आलं नव्हतं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंतिम मुकाबल्यात प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांचा डोंगर रचला. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या आघाडीच्या शिलेदारांनी वादळी अर्धशतकी खेळी साकारत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या डोंगरासमोर खेळताना न्यूझीलंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. तिलक वर्माने लॉकी फर्ग्युसनचा झेल घेताच खेळाडूंनी एकच जल्लोष केला. न्यूझीलंडचा डाव १५९ धावांतच आटोपला.
