Delhi Building Collapse : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एक पाच मजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. या घटनेत काही जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही इमारत कोसळल्यानंतर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

एनडीआरएफ, दिल्ली अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत एक ‘पेइंग-गेस्ट’ (PG) होती आणि त्यामध्ये काही विद्यार्थी भाड्याने राहत होते. दरम्यान, ही इमारत कोसळण्याच्या घटनेनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी प्रतिक्रिया देत या घटनेत दोषी असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. या घटनेवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया देत ही घटना अत्यंत दुःखद असल्याचं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?

“दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एक इमारत कोसळल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो. प्रशासनाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू असून या दुर्घटनेत बाधित झालेल्यांना मदत केली जात आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी काय प्रतिक्रिया दिली?

“दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात इमारत कोसळल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. दिल्ली विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांसह अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मी एनडीआरएफ, दिल्ली अग्निशामक दल आणि सर्व बचाव पथकांना आवाहन करतो की, त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, जखमींना त्वरित उपचार मिळतील याची खात्री करावी. जेणेकरून बचाव कार्यात कोणतीही कसर राहणार नाही. काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित असून सर्वतोपरी मदत करत आहेत. या कठीण काळात आम्ही पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. विद्यार्थ्यांचं जीवन आधीच संघर्षांनी भरलेलं आहे. आता तर परिस्थिती आणखी जीवघेणी बनली आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वसतिगृहांच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ‘पेइंग-गेस्ट’ म्हणून अत्यंत अमानवीय परिस्थितीत राहावं लागत आहे. जिथे एकाच छताखाली तब्बल ४० जण एकत्र राहत होते. प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य मौल्यवान आहे आणि त्याचं रक्षण केलंच पाहिजे”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

नेमकी घटना काय घडली?

दिल्लीमधील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एक दुर्घटना घडली. एक पाच मजली इमारत अचानक कोसळली आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. ही पाच मजली इमारत ‘पेईंग गेस्ट’ निवासस्थान म्हणून वापरली जात होती.