इन्स्टाग्रामवर सध्या एक ट्रेंड चांगलाच चर्चेत आला आहे. ज्या ट्रेंडचं नाव आहे #80sTrend. इन्स्टाग्राम फिड उघडलं रे उघडलं की सगळ्यांचेच १९८० च्या दशकातले लूक व्हायरल झाले आहेत. सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच याची भुरळ पडली आहे. यातून राजकारणी कसे काय मागे राहतील? चॅटजीपीटीवर कमांड दिली की १९८० मध्ये तुमचा लूक कसा असेल हे दाखवणारा हा खास ट्रेंड आहे. आपण जाणून घेऊ हा ट्रेंड काय आहे आणि कुठल्या राजकारण्यांचे फोटो व्हायरल झालेत?

नरेंद्र मोदी ते किरेन रिजेजू सगळ्यांचेच लूक व्हायरल

भाजपाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री पियूष गोयल, केंद्रीय मंत्री किरेन रिजेजू, हिमंता बिस्वा सर्मा यांच्यासह अनेकांचे 80s लूक व्हायरल करण्यात आले आहेत. या खास व्हिडीओला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. चॅटजीपीटीच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओला हवा हवा ऐ हवा या गाण्याचं म्युझिकही देण्यात आलं आहे.

काँग्रेसने पोस्ट केले राहुल गांधींचे खास लूकमधले फोटो

काँग्रेस सेवा दल या ट्वीटर हँडलवरुन राहुल गांधींचे 80s लूकचे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. राहुल गांधी यांना जननायक असंही म्हटलं गेलं आहे. Rahul Gandhi catches the 80s trend wave असं म्हणत ही खास पोस्ट करण्यात आली आहे. सूट घातलेल्या रुपात राहुल गांधी चहाचा आस्वाद घेताना या फोटोंमध्ये दिसत आहेत. अर्थातच हे फोटोही चॅटजीपीटीवरुनच तयार करण्यात आले आहेत.

व्हायरल झालेला 80s Trend नेमका काय आहे?

80s Trend हा चॅटजीपीटीच्या मदतीने तयार करण्यात येणाऱ्या फोटोंचा एक खास ट्रेंड आहे. ChatGPT वर तुमचा आवडीचा फोटो शेअर केल्यानंतर त्याला योग्य प्रॉम्ट दिला की काही काळातच कुठलाही फोटो हा १९८० च्या दशकातला दिसू लागतो. तो काळ, त्यावेळी असलेली कपड्यांची, गॉगलची पद्धत असं सगळं यात दिसतं. अनेक सेलिब्रिटींनीही हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये फिल्म ग्रेन, सॉफ्ट लाइट आणि रोल असलेल्या कॅमेरांमधून जसा परिणाम फोटोंवर दिसत असे तसा देण्यात आला आहे. त्यामुळे हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वी असाच Ghibli नावाचा एक ट्रेंड आला होता. त्यावरही लोक तुटून पडले होते. आता 80sTrend नावाने हा ट्रेंड आला आहे जो चांगलाच चर्चेत आला आहे आणि आता राजकारण्यांचे त्या लूकमधले फोटोही व्हायरल झाले आहेत.