PM Modi Rahul Gandhi interaction news : भारतीय राजकारणात शनिवारी सकाळी एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला. दिल्लीत महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकमेकांना हात जोडून’नमस्ते’ करत संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेच्या आवारातील ‘प्रेरणा स्थळ’ येथे आले. तेव्ह विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि इतर केंद्रीय मंत्रीही तिथे उपस्थित होते. यावेळी मोदी आणि गांधी यांनी एकमेकांचे स्वागत केले आणि त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे स्वागत करण्यासाठी हे दोन्ही नेते इतर मंत्र्यांसोबत सहभागी झाले. मोदी आणि गांधी यांनी या थोर समाजसुधारकाला आदरांजली वाहिली आणि बराच वेळ एकमेकांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना त्यांच्या समता आणि सामाजिक न्यायाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे कौतुक केले. एका ब्लॉग पोस्टमध्ये मोदी म्हणाले, “थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे जीवन हे नैतिक धैर्य, आत्मचिंतन आणि समाजकल्याणासाठी असलेल्या अटळ समर्पणाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.”
राहुल गांधी यांनीदेखील महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी समर्पित केल्याचे सांगितले. “भेदभाव आणि विषमतेविरुद्ध फुलेंनी दिलेला लढा राष्ट्राला न्याय आणि समतेच्या मार्गावर नेणारा आहे. त्यांचे आदर्श सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना नेहमीच प्रेरणा देत राहतील,” असे काँग्रेस खासदाराने नमूद केले.
