PM Modi Rajasthan Refinery Fire Latest Update: A massive fire broke out at the Pachpadra refinery just 24 hours before PM Modi’s inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानमधील एका रिफायनरीचे उद्घाटन नियोजित होते. या कार्यक्रमाला अवघे २४ तास उरले असताना, त्या रिफायनरीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरल्याचे पाहायला मिळाले.
बालोत्रा येथील पचपद्रा येथे असलेली ही रिफायनरी भारतातील पहिली ‘ग्रीनफिल्ड’ इंटिग्रेटेड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स असून, हा हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि राजस्थान सरकार यांनी मिळून सुरू केलेला प्रकल्प आहे.
या प्रकल्पाचा उद्देश हा, भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासह भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे हा आहे.
या रिफायनरीचे भूमीपूजन सर्वप्रथम २२ सप्टेंबर २०१३ रोजी राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हा सुरूवातीला या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३७२३० कोटी रुपये होता. सत्तांतर झाल्यानंतर, १६ जानेवारी २०१८ रोजी पंतप्रधान मोदींनी हा प्रकल्प पुन्हा लाँच केला आणि तेव्हा या प्रकल्पाचा सुधारित खर्च ४३१२९ कोटी रुपये इतका झाला. इंधन निर्मितीबरोबरच रिफायनरीमध्ये इतरही डाउनस्ट्रीम पेट्रोकेमिकल उत्पादने तयार केली जाणे अपेक्षित आहे.
हे घटक या प्रदेशातील आगामी औद्योगिक युनिट्ससाठी उच्च-गुणवत्तेचा कच्चा माल म्हणून काम करतील. पॉलिप्रोपीलीन, पॉलिथिलीन(एचडीपीई/एलएलडीपीई), बेंझिन ), टॉल्युइन (Toluene) आणि ब्युटाडाइन सारख्या उत्पादनांवर आधारित उद्योग या ठिकाणी उभारले जाण्याची शक्यता आहे.
या उत्पादनांमुळे प्लास्टिक फर्निचर, शेतीत वापरले जाणारे पाईप, पॅकेजिंग फिल्म, ऑटोमोबाईलचे भाग, सिंथेटीक फायबर, वैद्यकीय अवजारे, आणि पेंट, डिटर्जन्ट यासारखे केमिकल्स यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करणे शक्य होईल.
