पश्चिम आशियातील युद्धामुळे संपूर्ण जग मंदीच्या विळख्यात सापडले असताना, भारताने २१ व्या शतकातील सर्वात मोठ्या ऊर्जा संकटाचा यशस्वीपणे सामना केला आहे, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय, अचूक नियोजन आणि भारताच्या मजबूत मुत्सद्देगिरीमुळे देश इंधनाच्या मोठ्या धक्क्यातून सुरक्षित राहिला, असं प्रतिपादन त्यांनी केलं.

राजस्थानमधील बहुप्रतीक्षित रिफायनरी प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी जोधपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचंही लोकार्पण केलं.

‘नव्या भारताच्या इच्छाशक्तीनं संकट परतवून लावलं’

जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था अभूतपूर्व ऊर्जा संकटाचा सामना करत आहेत. मात्र, २१ व्या शतकातील नव्या भारताच्या इच्छाशक्तीनं आणि प्रयत्नांनी या महासंकटावर मात केली आहे.”

भारतानं प्रत्येक पातळीवर वेळेतच योग्य निर्णय घेतले, संकटाचा आधीच अंदाज घेऊन प्रभावी रणनीती आखली आणि आपल्या राष्ट्रीय संसाधनांचा संतुलितपणे वापर केला, ज्यामुळे देशांतर्गत पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

याच दरम्यान विरोधकांवर निशाणा साधताना पंतप्रधान म्हणाले, “संकटाच्या काळात काही शक्ती देशात भीतीचे वातावरण आणि अफवा पसरवण्यात व्यस्त होत्या. मात्र, आमचे सरकार सर्वसामान्यांना अखंड ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पडद्यामागे अहोरात्र काम करत होते.”

४० देशांमधून इंधनाचा पुरवठा; ७५,००० कोटींचा भार सरकारनं सोसला

भारताच्या एलपीजी (LPG) गरजेपैकी जवळपास ६० टक्के भाग आयातीवर अवलंबून आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे ‘हॉर्मुजची सामुद्रधुनी’ बंद होण्याचा धोका निर्माण झाला होता, ज्यामुळे भारतात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकला असता.

“युद्धाच्या काळात भारतीय मुत्सद्देगिरीने आपली खरी ताकद दाखवून दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या मजबूत संबंधांमुळेच आपण अशा कठीण परिस्थितीतही जगातील तब्बल ४० देशांमधून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यात यशस्वी झालो.” – पंतप्रधान नरेंद्र मोदी</strong>

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असताना, सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा पडू नये म्हणून सरकारी तेल कंपन्यांनी ७५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान स्वतः सोसले, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी करून व्यावसायिक क्षेत्राला दिलासा दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.

“हा रिफायनरी प्रकल्प भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल”

ऊर्जा सुरक्षेला देशाच्या स्वाभिमानाशी जोडत पंतप्रधान म्हणाले की, एखादा देश जेव्हा ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होतो, तेव्हाच त्याचा जागतिक आदर वाढतो. राजस्थानमधील हा रिफायनरी प्रकल्प भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे. “हा प्रकल्प केवळ दगड रचण्याचा नाही, तर तो पूर्ण करण्याचा भाजप सरकारचा संकल्प दर्शवतो,” असे सांगत पंतप्रधानांनी विरोधकांना टोला लगावला.

काँग्रेसवर घणाघात आणि ‘डबल इंजिन’ सरकारचं कौतुक

२०१८ ते २०२३ दरम्यान राजस्थानमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, आधीच्या सरकारच्या राजकीय अनास्थेमुळे हा महत्त्वाकांक्षी रिफायनरी प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला होता. राज्यात भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार आल्यानंतरच या कामाला खरी गती मिळाली.

आपल्या खास शैलीत विरोधकांना उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुम्ही मला ओळखता, ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन मी करतो, त्याचे उद्घाटनही मीच करतो!” त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल नकारात्मकता पसरवणाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले की, जे लोक जागतिक संकटाच्या काळात भारताच्या अपयशाची भविष्यवाणी करत होते, ते आज निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. भारताने आपल्या निर्णायक नेतृत्वाने आणि धोरणांनी जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे.