PM Modi Rajya Sabha Speech on West Asia War and India’s Fuel Supply: पश्चिम आशियामध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या तेल आणि गॅस पुरवठ्यावर होण्याची भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांनी या युद्धजन्य परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत शांततेचे आवाहन केले.
“पश्चिम आशियातील युद्धाचा आपल्या सर्वांवर परिणाम झाला आहे. या युद्धाबाबत सरकारची भूमिका मला सभागृहासमोर आणि भारतातील जनतेसमोर मांडायची आहे. हे युद्ध तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू आहे. त्यामुळे जगात इंधनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भारतातील परिस्थितीही चिंताजनक आहे”, असे मोदी म्हणाले.
भारताची इंधन सज्जता
भारताच्या इंधन सज्जतेवर प्रकाश टाकतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या ११ वर्षांत देशाने ५३ लाख मेट्रिक टन (MT) सामरिक तेलसाठा (Strategic Petroleum Reserve) निर्माण केला असून, त्यात आणखी ६५ लाख मेट्रिक टनची भर घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या १० वर्षांत भारताची तेल शुद्धीकरण क्षमताही लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे.
इंधनासाठी पर्यायी व्यवस्था
“मी देशाला आश्वासन देऊ इच्छितो की, भारताकडे पुरेसा कच्च्या तेलाचा साठा आणि अखंड पुरवठ्याची व्यवस्था आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सरकार केवळ एलपीजीवर अवलंबून न राहता घरगुती वापरासाठी पीएनजी (PNG) च्या वापराला प्रोत्साहन देत आहे. तसेच, इंधन, पुरवठा साखळी आणि खते यांसारख्या विषयांवर धोरणे आखण्यासाठी सरकारने ७ अधिकारप्राप्त गट स्थापन केले आहेत. जहाज निर्मिती क्षेत्रासाठी ७०,००० कोटी रुपयांचा भव्य प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून भविष्यात अशा जागतिक संकटांचा सामना करणे सोपे होईल.
ऊर्जा आणि व्यापार मार्गावर संकट
पंतप्रधान म्हणाले की, “होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे, जिथून कच्चे तेल, एलपीजी आणि खतांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. सध्या या मार्गावर जहाजे अडकून पडल्याने भारताच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गावरील अडथळे भारतासाठी अस्वीकार्य आहेत.” जर ही स्थिती अधिक काळ राहिली, तर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीत मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
