PM Modi Rajya Sabha Speech on India Oil and Gas Supply Impact: पश्चिम आशियामध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचा थेट परिणाम भारताच्या तेल आणि गॅस पुरवठ्यावर होण्याची भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांनी या युद्धजन्य परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत शांततेचे आवाहन केले.
ऊर्जा आणि व्यापार मार्गावर संकट
पंतप्रधान म्हणाले की, होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे, जिथून कच्चे तेल, एलपीजी आणि खतांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. सध्या या मार्गावर जहाजे अडकून पडल्याने भारताच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. “व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गावरील अडथळे भारतासाठी अस्वीकार्य आहेत,” असे खडे बोल त्यांनी सुनावले. जर ही स्थिती अधिक काळ राहिली, तर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीत मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुटका
आखाती देशांमध्ये जवळपास १ कोटी भारतीय वास्तव्यास असून त्यांची सुरक्षा हा भारतासाठी प्राधान्याचा विषय आहे. पंतप्रधानांनी माहिती दिली की, आतापर्यंत ३ लाखांहून अधिक भारतीयांना युद्धभूमीतून सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. यामध्ये इराणमधील ७०० वैद्यकीय विद्यार्थ्यांसह १,००० नागरिकांचा समावेश आहे. युद्धात काही भारतीयांचा मृत्यू झाला असून काही जण अद्याप बेपत्ता आहेत; त्यांच्या कुटुंबांना सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शांततेसाठी भारताची मुत्सद्देगिरी
भारत सध्या अमेरिका, इराण आणि इस्रायल यांसारख्या प्रमुख देशांच्या सतत संपर्कात आहे. “आम्ही सर्वांशी फोनवर चर्चा केली असून संवाद आणि कुटनीतीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे,” असे मोदींनी नमूद केले. भारताच्या संसदेतून शांततेचा एकजूट आवाज जगभर जावा आणि होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताने नेहमीच नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा निषेध केला असून, जागतिक शांततेसाठी भारत आपले प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
