राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवदेन केलं. मोदी म्हणाले, “सभागृहातील प्रत्येक सदस्यानं चांगली भूमिका मांडली आहे. यात काहीसा विरोधाचा सूरही लागला आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशातील जनतेनं फक्त सरकार बदलले नाही, बदलही बघितला आहे. काँग्रेसच्या वाटेनं आम्ही गेलो असतो, तर देश बदलला नसता. ३७० कलम, तिहेरी तलाक रद्द झालं नसतं. राम जन्मभूमीवर मंदिर झालं नसतं,” असं सांगत मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान केलं.

राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून नव्या भारताचं चित्र मांडलं आहे. राष्ट्रपतींचं भाषण सगळ्यांना दिशा आणि प्रेरणा देणारं आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये विश्वासाचं वातावरण तयार करणार आहे. मात्र, सरकारला सगळ्या कामांची इतकी घाई का आहे? सगळेच काम एकत्र का करत आहेत? असा सूर विरोधकांमधून लावला जात आहे,” असं म्हणत मोदी यांनी सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या कवितेतून प्रत्युत्तर दिलं.

आणखी वाचा – सूर्यनमस्कारांनी स्वत:ला दंडाप्रूफ करणार – मोदींचा राहुल गांधींना टोला

“लोकांनी केवळ सरकार बदलली नाही, तर देशात बदल होण्याचीही अपेक्षा ठेवली. नव्या विचारानं काम करण्याची देशाची इच्छा आणि अपेक्षा आहे. त्यामुळेच आम्हाला इथं येऊन काम करण्याची संधी मिळाली आहे. आम्हीही तुमच्याच रस्त्यानं चालत राहिलो असतो, तर ७० वर्षानंतरही ३७० कलम हटवलं गेलं नसतं. तुमच्याप्रमाणेच काम केलं असतं, तर मुस्लीम महिलांना आजही तिहेरी तलाकची भिती वाटत राहिली असती. राम जन्मभूमीवरून आजही वाद सुरूच असता. कतारपूर साहिब कॉरिडॉरही झाला नसता. तुमच्याच मार्गानं चालत राहिलो असतो, तर भारत-बांगलादेश वाद कधीच सुटला नसता,” असं सांगत मोदी यांनी काँग्रेसला धारेवर धरले.