PM Narendra Modi’s humorous remark to Telangana CM Revanth Reddy : “ज्याप्रमाणे मनमोहन सिंग सरकारने गुजरातला पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा मोदी सरकारने तेलंगणाला द्यावा”, अशी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मिश्लिकपणे उत्तर दिलं आहे. हैदराबादमध्ये ९ हजार ४०० कोटी रुपयांच्या सहा विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी हा संवाद झाला.

तुम्ही माझ्याबरोबर येणंच उत्तम

रेवंत रेड्डी यांनी आपल्या भाषणात “ज्याप्रमाणे मनमोहन सिंग सरकारने गुजरातला पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा मोदी सरकारने तेलंगणाला द्यावा”, अशी विनंती केली होती. त्यावर मोदी म्हणाले, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गुजरातला १० वर्षांत जे काही दिले (जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते), ते सर्व मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण मग राज्याला सध्या केंद्राकडून जे मिळत आहे, त्याच्या निम्म्यावरच समाधान मानावे लागेल आणि तुम्ही तुमची ध्येये गाठू शकणार नाही. म्हणूनच, तुम्ही माझ्यासोबत येणंच अधिक चांगलं आहे.”

तेलंगणाचे रेल्वे बजेट वाढवलं

मोदी पुढे म्हणाले, “रेवंत म्हणाले होते की ते राजकीय विधान करणार नाहीत, त्यामुळे मीदेखील तसे करणार नाही.” यावेळी त्यांनी निधीचा तुलनात्मक आकडा मांडताना सांगितले की, “पूर्वीच्या अविभक्त आंध्र प्रदेशचे रेल्वे बजेट १ हजार कोटी रुपये होते, पण आता एकट्या तेलंगणासाठी ५ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली आहे.”

हैदराबादमधील एचआयसीसी (HICC) येथे आयोजित या कार्यक्रमात मोदींनी ९ हजार ४०० कोटी रुपयांचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रकल्पांमुळे तेलंगणाला मोठा फायदा झाला असून देशासोबतच राज्याचाही विकास होईल. या प्रकल्पांमुळे हजारो रोजगार निर्माण होतील आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल.

“देश सध्या ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर स्वार आहे आणि आजचा भारत प्रगत पायाभूत सुविधा निर्माण करत आहे”, असंही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मोदींचे ३ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे जे स्वप्न आहे, त्यात तेलंगणा १०% योगदान देईल. रेड्डी म्हणाले, “जेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा मोदींनी मुख्यमंत्री म्हणून १० वर्षांत ‘गुजरात मॉडेल’ साकारले. त्याचप्रमाणे तेलंगणातील जनतेलाही माझ्या नेतृत्वाखाली पुढील १० वर्षांत ‘तेलंगणा मॉडेल’ साकारण्याची आशा आहे.”

राजकीय मतभेद बाजूला ठेवत रेड्डी पुढे म्हणाले की, “मोदींना भारताचा विकास करायचा आहे, तर त्यांनी तेलंगणालाही सोबत घेऊन चालावे. तेलंगणाच्या विकासासाठी कृपया दोन तास वेळ द्या, जेणेकरून आम्ही आमचे प्रस्ताव सादर करू शकू.” तसेच, मोठ्या सहा शहरांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी केंद्राने ‘सिंगल विंडो सिस्टम’ आणावी, अशी मागणीही त्यांनी केली. “मोदीजी त्यांच्या मोठ्या मनासाठी ओळखले जातात. त्यांनी तेलंगणाकडे लक्ष देऊन आमच्या विकास प्रकल्पांना पाठिंबा द्यावा”, अशी विनंतीही रेड्डी यांनी केली. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमध्ये झहीराबाद इंडस्ट्रियल पार्क (राष्ट्रीय औद्योगिक उत्पादन क्षेत्र), मलकापूर येथील आयओसी (IOC) टर्मिनल आणि काझीपेट ते विजयवाडा दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या मल्टि-ट्रॅकिंग कामाचा समावेश आहे.