नवी दिल्ली : देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ‘सप्तधारा’ अर्थात सात विकासप्रवाहांची संकल्पना मांडली. उत्पादन, शेती व अन्नप्रक्रिया, तंत्रज्ञान व नवोपक्रम, गतिशक्ती, संरक्षण शक्ती, हरित व निळी अर्थव्यवस्था आणि सॉफ्ट पॉवर या सात क्षेत्रांवर केंद्रित प्रयत्नांतून विकसित भारताचा पाया मजबूत केला जाईल, असे मोदी म्हणाले. त्याचबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या तरुणांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोफत ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था उभारण्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधानांनी केली.

लाल किल्ल्यावरून शनिवारी, ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेन-झी तरुणांना साद घातली. जेन-झींच्या आशा-आकांक्षा आणि युवा-शक्तीचा देशाच्या विकासातील सहभागावर मोदींनी भाषणात भर दिला. याशिवाय, २०४७मध्ये ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी आर्थिक सुधारणांची दिशाही मोदींनी स्पष्ट केले. त्यासाठी मोदी ‘सप्तधारा’चा रोडमॅपही उलगडून दाखवला. या सात क्षेत्रांमध्ये समन्वय साधून भारताने पुढील पाच-सात वर्षांत सुधारणांना नवी गती द्यावी, हा या संकल्पनेमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

सुधारणा हा केवळ प्रचलित शब्द नाही किंवा कोणी सक्ती केली म्हणून त्या केल्या जात नाहीत, ती दृढ धारणा आहे. आपण ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’वर स्वार झालो आहोत आणि आता सुधारणांच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करीत आहोत, असे मोदी म्हणाले. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला नवी दिशा देण्यासाठी मोदींनी ‘सप्तधारा’चा विचार मांडला.

तिरंगा फडकवल्यानंतर, सुमारे ७५ मिनिटांच्या भाषणात मोदींनी नक्षलवाद, महिला आरक्षण, युवा शक्ती, आर्थिक सुधारणा-विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जेन-झी आंदोलकांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेले अत्याचार, पॅलेट गनचा वापर या मुद्द्यांवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारची विरोधकांनी कोंडी केली होती. त्यामुळे लाल किल्यावरून मोदी नेमके काय बोलणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागले होते.

‘दिमागी नक्षलवाद्यां’पासून सावधान

सशस्त्र नक्षलवादाचे देशातून जवळपास उच्चाटन झाले आहे. मात्र नक्षलवादी विचारसरणीचा प्रभाव अजूनही सार्वजनिक जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये आणि संस्थांमध्ये टिकून आहे. अशा ‘दिमागी नक्षलीह्ण प्रवृत्ती ओळखून त्यांना एकटे पाडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. अशा प्रवृत्ती हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचे, देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न करू शकतात. देशाच्या विकासासाठी तरुणांनी या विचारसरणीपासून दूर राहिले पाहिजे, असे मोदी म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ माओवादी विचारसरणीच्या व्यक्तींचा प्रभाव राहिला. सरकारी समित्या आणि विविध संस्था तसेच उपक्रमांवरही या विचारसरणीचा प्रभाव असल्याचे त्यांनी नमूद केले. नक्षलवादामुळे देशाला मोठी मानवी आणि सामाजिक किंमत मोजावी लागली. नक्षलवादाविरोधातील कारवाईत ३,५०० हून अधिक सुरक्षा जवान शहीद झाल्याचे मोदी यांनी सांगितले.

‘जेन-झीं’साठी सरकारचे एक पाऊल पुढे

स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या तरुणांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोफत ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था उभारण्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आगामी एका वर्षात एक कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर तरुणांना भविष्यासाठी सज्ज करण्यावर सरकारचा भर असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.