नवी दिल्ली : काँग्रेसच्या ‘प्रेमाच्या दुकाना’त द्वेष आटोकाट भरलेला आहे, काँग्रेसला माझी कबर खोदायची आहे. मोदी की कब्र. ही काँग्रेसची केवळ घोषणा नव्हे, विद्वेषाचे प्रतिबिंब आहे, ती काँग्रेसची अभिव्यक्ती आहे, असा घणाघाती शाब्दिक हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना केला.
लोकसभेमध्ये मोदींनी भाषण केले नव्हते. मात्र, राज्यसभेत केलेल्या दीड तासाच्या भाषणात मोदींनी काँग्रेस आदिवासी, दलित, शीख आणि महिलाविरोधी असल्याचा गंभीर आरोप केला. काँग्रेसने देशाला विकासापासून वंचित ठेवले होते, आता मात्र देश विकसित होण्याकडे वेगाने धावू लागला आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. काँग्रेस मला २००२ पासून म्हणजे २५ वर्षे शिव्या घालत आहे. मी पंतप्रधान नव्हतो तेव्हादेखील संसदेचे एकही अधिवेशन असे नव्हते जिथे मला शिव्या घातल्या गेल्या नाहीत. मी पंतप्रधान झालो ही बाब काँग्रेसला खुपते. मी पंतप्रधान झालो पण, इतकी वर्षे या पदावर टिकून कसा, याचेही त्यांना आश्चर्य वाटते. त्यांना माझा द्वेष करण्याशिवाय दुसरा मार्ग सापडत नाही म्हणून काँग्रेसला माझी कबर खोदायची आहे, असे शरसंधान मोदींनी साधले. आम्ही अनुच्छेद ३७० रद्द केले, ईशान्येकडील राज्यामध्ये दहशतवाद संपवून शांतता प्रस्थापित केली, पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्डे नष्ट केले. ऑपरेशन सिंदूर केले, माओवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी धाडसी पावले उचलली हे सगळे देशहितासाठी मी करत आहे म्हणूनच काँग्रेसला माझी कबर खोदायची आहे, अशी टीका मोदींनी केली.
लोकशाहीविरोधी वर्तन लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी केलेला गदारोळ, पीठासीन अधिकार्याच्या दिशेने भिरकावलेले कागदाचे कपटे आदी या घटनांचा संदर्भ देत, मोदींनी काँग्रेस संविधानविरोधी, लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत अडथळा आणून काँग्रेसने आदिवासी महिला राष्ट्रपतीचा अपमान केला आहे. संविधान शब्द उच्चारण्याचाही अधिकार काँग्रेसला नाही. संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर असून त्याचाही काँग्रेसने अपमान केला आहे. असा प्रहार मोदींनी केला. काँग्रेसच्या खासदारांनी कपटे फेकले तेव्हा पीठासीन अधिकारी म्हणून भाजपचे आसामचे खासदार दिलीप सैकिया काम पाहात होते. हा त्यांचाच नव्हे आसामचा अपमान झाला आहे. त्यांच्यानंतर कृष्णाप्रसाद तेन्नेटी काम पाहात होते, त्यांच्याशी गैरवर्तवणूक करून काँग्रेसने दलित सदस्याचा अपमान केला आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना राहुल गांधींनी गद्दार म्हणून हिणवले. काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडले, अनेकदा तर काँग्रेसमध्येही फूट पडली. राहुल गांधींनी इतरांना गद्दार म्हटले नाही पण, रवनीत यांना हिणवले कारण काँग्रेस शीखविरोधी आहे. त्याबद्दल राहुल गांधींना खेदही वाटत नाही. काँग्रेसला शीखांबद्दल घृणा आहे, असे अनेक आरोप करत मोदींनी काँग्रेस व राहुल गांधींना लक्ष्य केले.
विरोधकांचा सभात्याग
मोदींच्या भाषणामध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या सदस्यांनी या मुद्द्यावरून घोषणाबाजी केली व त्यानंतर त्यांनी सभात्याग केला. यावेळी तृणमूल काँग्रेस, आपचे सदस्य गैरहजर होते. तरीही मोदींनी भाषण करू दिल्याबद्दल काँग्रेसचे उपहासात्मक आभार मानले. १० वर्षांमध्ये संसदेमध्ये ५-६ वेळा मला बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. पण, त्यांना मी एकटाच पुरेसा आहे, असे ठणकावले होते. तेव्हापासून त्यांना माहीत आहे की, माझे भाषण ते रोखू शकत नाहीत, असा टोमणा मोदींनी मारला.

