केंद्राने लष्करभरतीसाठी नव्याने जाहीर केलेल्या अग्निवीर योजनेच्या विरोधात उसळलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. एकीकडे दुपारच्या सुमारास या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली तर दुसरीकडे सकाळी प्रगती मैदान येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच अग्निपथ या योजनेवरुन देशभरामध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनांवर आणि हिंसेसंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केल्याचं पहायला मिळालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी दिल्लीतली प्रगती मैदानमध्ये टनलचं उद्घाटन केलं. यापूर्वी मोदींनी टनलची पहाणी केली. यावेळी मोदींनी दिलेल्या भाषणामध्ये प्रगती मैदानाचं महत्व सांगितलं. “अनेक दशकांपूर्वी भारताची प्रगती, सामर्थ्य, वस्तू आणि संस्कृती दाखवण्याच्या उद्देशाने या मैदानाची निर्मिती करण्यात आला. मात्र प्रगती मैदानाची प्रगती फार आधीच थांबली होती. याची योजना केवळ कागदावर होती. प्रत्यक्षात काहीही झालं नाही,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. याचसंदर्भात पुढे बोलताना त्यांनी अग्निवीरच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या हिंचाचारासंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. “हा आजचा नवा भारत आहे. हा भारत समाधान शोधतो. नव्या कामांसाठी इथे फार संकटांना तोंड द्यावं लागतं,” असंही म्हटलं.

दिल्लीतील परिस्थितीबद्दल केलं भाष्य
“हे सारं चित्र बदलण्यासाठी केलं जात नाहीय तर या माध्यमातून नशीब बदलता येईल. दिल्लीमध्ये केंद्र सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सेवा उभारण्याच्या प्रयत्नात आहे. याचा थेट परिणाम आणि हेतू हे रहाणीमान सुधारण्यासाठी आहे,” असं मोदी म्हणाले. “दिल्ली-एनसीआरमध्ये मेट्रो सेवांची व्याप्ती १९३ किलोमीटरवरुन ४०० किलोमीटरपर्यंत पोहचलीय. दिल्ली-एनआरसीमध्ये वाढलेल्या मेट्रोच्या जाळ्यामुळे आता येथे रस्त्यावरील गाड्यांची संख्या हजारोंनी कमी झालीय. यामुळे प्रदुषण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळत आहे,” असं मोदी म्हणाले.

गरीबांना घरं दिली
शहरांमधील गरीब आणि शहरी मध्यम वर्गीयांसाठी उत्तम सुविधा देण्यासाठी आज फार वेगाने काम सुरु आहे. मागील आठ वर्षांमध्ये १.७० कोटींहून अधिक शहरांमधील गरीब लोकांना पक्की घरं देण्यात आलीय. मध्यम वर्गातील लाखो लोकांना घरांसाठी मदत करण्यात आल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले.