PM Modi on Situation in West Asia : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बोलताना मध्यपूर्वेतील संकटामुळे भारत चिंतित असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी तणाव कमी करण्यासाठी संवादाचा मार्ग निवडण्यावर भर दिला आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी याबद्दल भाष्य केले आहे.

“पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती आमच्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. भारत संवादाच्या माध्यमातून सर्व संघर्ष सोडवले जावेत याचे समर्थन करतो. या भागात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्व देशांबरोबर मिळून काम करत राहू,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

आम्ही सदैव शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. आणि जेव्हा दोन लोकशाही एकत्र येतात तेव्हा शांततेचा आवाज आणखी सशक्त होतो, असेही पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, दहशतवाद आणि कट्टरतावाद यांचा प्रभाव या विषयावर कॅनडा आणि भारत यांची एकच भूमिका आहे. ही संपूर्ण जगासमोर असलेली मोठी आव्हाने आहेत, असेही मोदींनी स्पष्ट केले.

मात्र पंतप्रधान मोदींनी यावेळी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही किंवा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचाही उल्लेख केला नाही.

मध्यपूर्वेतील संकट

इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरुद्ध संयुक्त लष्करी कारवाईला सुरूवात केल्यानंतर मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इस्रायल-अमेरिकेने केलल्या या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे निधन झाल्यानंतर हा संघर्ष चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे.

इराणने त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलला प्रत्युत्तर दिले आहे. इराणने बहरीन व कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य केले. दरम्यान, लेबनॉनमधील कट्टरपंथी इस्लामिक राजकीय संघटना हिजबुल्लाने, खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हल्ले सुरू केले आहेत. यामुळे संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आता इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या विरोधात मोहिम सुरू केली आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात लेबनॉनमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.