पंतप्रधान मोदी शशी थरूर यांना म्हणाले "Thank You" आणि संसदेत एकच हशा... नेमकं काय घडलं? | PM Modi says Thank you to Shashi Tharoor in loksabha All MPs started laughing | Loksatta

पंतप्रधान मोदी शशी थरूर यांना म्हणाले “Thank You” आणि संसदेत एकच हशा… नेमकं काय घडलं?

लोकसभेत बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांचे आभार मानले.

PM Modi on Shashi Tharoor
पंतप्रधान मोदींनी थरूर यांचे आभार मानताच सर्व खासदार हसू लागले. (PC : ANI)

लोकसभेत बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना एक गंमतीदार घटना घडली. यावेळी संसदेत सर्व खासदार खळखळून हसू लागल्याचं पाहायला मिळालं. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना मिश्किलपणे थँक्यू म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते. तेव्हा काँग्रेसच्या सर्व खासदारांनी वॉकआऊट केलं. परंतु त्यानंतर काही वेळाने शशी थरूर संसदेत परत आले. थरूर यांना पाहताच नरेंद्र मोदी त्यांना म्हणाले, “थँक यू शशी थरूर जी…” मोदींनी थरूर यांचे आभार मानताच संसदेत उपस्थित बहुतांश खासदार हसू लागले. ही घटना एवढ्यावरच संपत नाही. तर मोदींनी आभार मानल्यानंतर भाजपाच्या खासदारांनी ‘हो गया कांग्रेस में बंटवारा’ (काँग्रेसमध्ये फूट पडली) अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही वेळाने काँग्रेस खासदार राहुल गांधी देखील सर्व खासदारांसह लोकसभेत परतले.

मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदी म्हणाले की, हार्वर्ड विद्यापीठात काँग्रेसचं पतन होण्यासंदर्भात एक अभ्यास करण्यात आला आहे. मला विश्वास आहे की, भविष्यात काँग्रेसच्या पतनावर केवळ हार्वर्ड विद्यापीठच नव्हे तर अनेक मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये अभ्यास होणार आहे.

हे ही वाचा >> राजधर्माबाबतच्या उल्लेखामुळे खरगे-सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक

दुष्यंत कुमारांच्या कवितेचा आधार घेत काँग्रेसवर हल्ला

मोदी यावेळी संसदेत महान हिंदी साहित्यिक दुष्यंत कुमार यांच्या कवितेतली एक ओळ म्हणाले. ते म्हणाले की, “दुष्यंत कुमार यांची ही ओळ काँग्रेससाठी अगदी योग्य आहे. ‘तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं।’ (तुमच्या पायाखाली जमीन नाहीये, पण आश्चर्य आहे की, तुमचा त्यावर विश्वास नाही)”. दरम्यान, मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर भारत जोडो यात्रेवरून टीका केली, तसेच आपणही मागील शतकात काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला होता याची आठवण करून दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 10:06 IST
Next Story
विश्लेषण: देशातील उच्च शिक्षणाचा लेखाजोखा काय सांगतो? उच्च शिक्षणात महाराष्ट्र कुठे आहे?