बिश्केक : ‘‘दहशतवादाचा एक धोरण म्हणून वापर करणार्या देशांचा शांघाय सहकार्य संघटनेने (एससीओ) सामना करावा आणि दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये दुटप्पीपणा नसावा,’’ अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘एससीओ’च्या शिखर परिषदेमध्ये केली. पंतप्रधान मोदींनी अशी टिप्पणी करून पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे थेट इशारा दिला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि इतर जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत मोदींनी शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक शिखर परिषदेला संबोधित केले. पश्चिम आशियातील संकटावर मोदींनी यावेळी चिंता व्यक्त केली. आपापसांतील संघर्ष चर्चा आणि राजनैतिक मार्गाने सोडवावा, अशी भारताची भूमिका असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी असे प्रकल्प साकारताना इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखावा, असे स्पष्टपणे नमूद केले. ‘एससीओ’च्या सनदेचाच हा एक भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनी चीनला इशारा दिला असला, तरी त्यांच्या भाषणाचा मुख्य रोख पाकिस्तान आणि दहशतवादाला विरोध हा होता. ‘एससीओ’चे कार्य जनतेपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकांमधील थेट संपर्क ही ‘एससीओ’ची मोठी ताकद असल्याचे मोदी म्हणाले. येत्या पाच वर्षांत जनतेमधील संपर्क अधिक दृढ व्हावा, असे त्यांनी सांगितले.
दहशतवाद, फुटीरतावाद मोडून काढा – जिनपिंग
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनीही दहशतवाद व फुटीरतावादाविरोधात आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘सुरक्षा हे प्रथम उद्दिष्ट ठरवून, समान सुरक्षेसाठी पूरक वातावरणनिर्मितीला चालना द्यावी. सुरक्षेसंदर्भातील पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांवर समन्वयाने उपाययोजना कराव्यात. आण्विक सुरक्षेसाठी बहुराष्ट्रीय भागीदारीची गरज आहे. त्यासाठी संतुलित दृष्टिकोनाची गरज आहे.’’ ‘एससीओ’ देशांनी माहिती सुरक्षा, जैवसुरक्षा व अवकाश सुरक्षेमध्ये सहकार्य दृढ करावे; अंतर्गत बाबींत बाह्य् शक्तींना ढवळाढवळ करू देऊ नये, असे त्यांनी अमेरिकेचा थेट उल्लेख न करता म्हटले.
पाण्याचा शस्त्र म्हणून वापर नको – शरीफ
इस्लामाबाद : ‘‘पाणी हे या भागासाठी जीवनवाहिनी असून, पाण्याचा कधीही शस्त्र म्हणून वापर करू नये,’’ असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले. भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबरील सिंधू जलवाटप करार रद्द करण्याची पार्श्वभूमी त्यांच्या वक्तव्यामागे होती. ‘एससीओ’ परिषदेत बोलताना शरीफ म्हणाले की, या भागात दीर्घकालीन शांतता नांदल्याखेरीज या प्रदेशाची पूर्ण क्षमता समजणार नाही.
दहशतवाद्यांचे आर्थिक जाळे, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांना आश्रय अशी दहशतवाद्यांची पूर्ण परिसंस्था उद्ध्वस्त करण्यासाठी ‘एससीओ’च्या देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, – नरेंद्र मोदी</strong>, पंतप्रधान
शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी सुरक्षेला प्रथम प्राधान्य देऊन दहशतवाद, फुटीरतावाद, बहुराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी मोडून काढावे. – क्षी जिनपिंग, अध्यक्ष, चीन
