scorecardresearch

“हे पैसे मला मोदींनी पाठवलेत,” म्हणत बँकेकडून चुकून जमा झालेले साडेपाच लाख परत देण्यास शिक्षकाचा नकार; अखेर…

बँकेने मागील वर्षापासून अनेकदा नोटीस पाठवून पैसे परत करण्यासंदर्भातील मागणी केली. मात्र या व्यक्तीने पैसे खर्च केल्याचं सांगत ते परत करण्यास नकार दिला.

“हे पैसे मला मोदींनी पाठवलेत,” म्हणत बँकेकडून चुकून जमा झालेले साडेपाच लाख परत देण्यास शिक्षकाचा नकार; अखेर…
बिहारमघ्ये घडला हा सर्व प्रकार, पोलिसांनी केली कारवाई (प्रातिनिधिक फोटो)

बिहार पोलिसांनी खागरिया जिल्ह्यामधून मंगळवारी एका ३० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीच्या अटकेमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही एक वेगळं कनेक्शन समोर आलं आहे. अटकेत असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर जमा झालेले ५ लाख ५० हजार रुपये त्याने परत करण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या खात्यावर हे पैसे जमा केल्याचा दावा करत या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिलेला.

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये रनजीत दास यांच्या दक्षिण बिहार ग्रामीण बँकेतील खात्यावर साडेपाच लाख रुपये जमा करण्यात आले. मात्र नंतर बँक अधिकाऱ्यांना ही रक्कम चुकून या व्यक्तीच्या खात्यावर जमा झाल्याचं समजलं. बँकेने दास यांच्याशी संपर्क साधला आणि पैसे तातडीने बँकेला परत करण्यासंदर्भात मागणी केली. मात्र मानसी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या बख्तियार गावात राहणाऱ्या दास यांनी हे पैसे परत करण्यास नकार दिला. बँकेने अनेकदा नोटीस पाठवूनही दास यांनी हे पैसे परत देण्यास नका दिला. इतकच नाही तर दास यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना आपण हे सर्व पैसे खर्च केल्याचंही सांगितलं. “जेव्हा माझ्या मोबाईलवर बँक खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज आला तेव्हा मला फार आनंद झाला. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हा फार जास्त पैसा आहे. मला वाटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पैसे मला पाठवले आहेत,” असं दास यांनी चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पंतप्रधान मोदींनी प्रत्येक गरीब व्यक्तीला १५ लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं याचा उल्लेख करत, “मला वाटलं की माझ्या खात्यावर जमा करण्यात आलेले साडेपाच लाख रुपये हे त्या १५ लाखांपैकी पहिला हफ्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात बिहारमधील प्रसारसभेत शब्द दिला होता,” असं दास यांनी म्हटलं आहे. दास हे पेशाने शिक्षक आहेत.

याच वर्षी १७ ऑगस्ट रोजी मानसी येथील दक्षिण बिहार ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक सत्या नारायण प्रसाद यांनी दास यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मंगळवारी पोलिसांनी दास यांना अटक करुन त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. मानसी पोलीस स्थानकाचे प्रमुख दीपक कुमार यांनी दास यांच्याविरोधात विश्वासर्हता भंग करणे या गुन्ह्याखाली कमल ४०६ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली असल्याचं सांगितलं. स्थानिक न्यायालयासमोर दास यांना हजर करण्यात आलं असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. बँकेच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा दास यांना पैसे परत करण्यासंदर्भात विनंती केली. मात्र दास यांनी नकार देत पैसे खर्च केल्याचं सांगितलं. बँकेने अर्धा डझनहून अधिक वेळा नोटीस पाठवूनही दास यांनी पैसे परत केले नसल्यांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या प्रकरणात आता बँकेच्या बेजबाबदारपणाचीही चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. तीन महिन्यांमध्ये दास यांनी वेगवेगळ्या रक्कमेत हा निधी आपल्या खात्यावरुन काढल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आलीय.

बँकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या दबावामुळे दास यांनी सर्व पैसे परत करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र नंतर त्यांनी नकार देत १ लाख ६० हजार ९७० रुपये परत केलेच नाही. पाटणा उच्च न्यायालयातील वकील राजीव राजन पांड्ये यांनी या प्रकरणात दास यांना न्यायालयाने दोषी ठरवलं असून या प्रकरणात त्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही गोष्टींचा समावेश असणारी शिक्षा सुनावली जाऊ शकते असंही पांड्ये म्हणालेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2021 at 08:42 IST

संबंधित बातम्या